अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर
विराट कोहली (७/१०) वन डे मालिकेत शतक न झळकावताही फलंदाजीत सातत्य राखले.गोलंदाजांचा योग्य वापर न केल्याने मात्र टीकेचा सामना करावा लागला. तिसऱ्या वन डेत प्रेरित करीत संघाला विजयी मार्गावर आणले. अजिंक्य रहाणे(४.५/१०) पहिल्या सामन्यात आकर्षक ७६ धावा केल्यानंतर पुढच्या दोन्ही सामन्यात शानदार सुरुवात करुन देण्यात अपयशी ठरला. मयंक अग्रवाल (४ /१०) पहिल्या दोन्ही सामन्यात चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. डाव सावरण्याऐवजी फटकेबाजीवर भर दिला.
श्रेयस अय्यर (२/१०) सीमारेषेवर चांगले क्षेत्ररक्षण केले मात्र फलंदाजीत निराशा झाली. डाव सावररण्यात अपयशी. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर कमालीचे अपयश. लोकेश राहुल (४.५/१०) राहुलला काही प्रगाणात यशस्वी मानले जाईल. दुसऱ्या वन डेतील ७६ धावांचा अपवाद वगळता मालिकेत मोठी खेळी करू शकला नाही. हार्दिक पांड्या (९/१०) ९० आणि नाबाद ९२ धावा ठोकून फलंदाजीत यशस्वी पुनरागमन केले. संघाची गरज ओळखून फटकेबाजी करण्यात यशस्वी. जखमेतून पूर्णपणे सावरु न शकल्याने अधिक गोलंदाजी करू शकला नाही पण योग्यतेची झलक पहायला मिळाली. रवींद्र जडेजा (७/१०) अपेक्षेनुरुप अधिक गडी बाद करता न आल्याने निराश झाला मात्र फलंदाजीत देखणी कामगिरी केली. तिसऱ्या वनडेत विशेषत: अर्धशतकी खेळी करीत लक्ष वेधले.
मोहम्मद शमी (४/१०) पहिल्या सामन्यात शानदार गोलंदाजी केली. दुसऱ्या सामन्यात मात्र महागडा ठरला. स्वींग आणि सीम चेंडू टाकण्यात अपयशी. युजवेंद्र चहल (१/१०) मालिका जिंकून देणारा गोलंदाज असलेला गोलंदाज सध्या अपयशी ठरला. गडी बाद करण्यातही अपयशी आणि चेंडूवर नियंत्रण राखण्यातही कमालीचा अयशस्वी. नवदीप सैनी (१/१०) अनुभवहीन असल्याचे जाणवले. चांगला मारा करण्याचा प्रयत्न केला पण वेग आणि टप्पा यांच्यात अचूकता राखण्यात अपयशी. डेथ ओव्हर्समध्ये फारच खर्चिक ठरला.जसप्रीत बुमराह (४/१०) पहिल्या दोन सामन्यात अडखळत खेळला. बळी न घेता मोठ्या धावा मोजल्या. अखेरच्या सामन्यात यॉर्करच्या बळावर मॅक्सवेल सारख्याला बाद केले. शुभमान गिल (४.५/१०) तिसऱ्या सामन्यात मयांक अग्रवालऐवजी स्थान मिळाले. अप्रतिम फलंदाजीचे दर्शन. याच बळावर टी-२० त खेळण्याची दावेदारी सादर केली.
शार्दुल ठाकूर (६.५ /१०) तिसऱ्या सामन्यात तीन महत्त्वाचे बळी घेत विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान. कठोर मेहनतीसह स्वींग आणि सीमचा योग्य वापर केला. कुलदीप यादव (३.५ /१०) तिसऱ्या वन डेत चहलसोबत संधी मिळाली. अपेक्षेनुसार उत्कृष्ट गोलंदाजी केली. लौकिकानुसार कौशल्यपूर्ण मारा करण्यात मात्र अपयशी ठरला. टी. नटराजन ( ५ /१०) तिसऱ्या वन डेत शानदार कामगिरीसह यशस्वी पदार्पण केले. काही करुन दाखवण्याचा निर्धार जाणवला. दडपणातही मधल्या षटकात धावा रोखणारी कामगिरी करीत लक्ष वेधले.