Mitchell Starc wife Alyssa Healy, IPL 2024 Playoffs KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने मंगळवारी खेळल्या गेलेल्या IPL क्वालिफायर-1 सामन्यात आपली चमक दाखवून दिली. मोक्याच्या क्षणी त्याने सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाचे महत्त्वाचे खेळाडू बाद केले. साखळी फेरीत २००चा टप्पा सहज गाठणाऱ्या SRHच्या संघाला क्वालिफायर सामन्यात कशीबशी १५९ धावांपर्यंत मजल मारता आली. मिचेल स्टार्क संपूर्ण साखळी फेरीत लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकला नव्हता. पण त्याची पत्नी आणि ऑस्ट्रेलियन महिला संघाची विकेटकिपर एलिसा हिली KKRला चिअर करण्यासाठी स्टेडियममध्ये आली आणि 'लेडी लक'च्या साथीने पती मिचेल स्टार्कने सामना जिंकवण्यात मोलाची भूमिका बजावली.
क्वालिफायर-1 सामन्यात मिचेल स्टार्कला सपोर्ट करण्यासाठी पत्नी एलिसा हिली अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उपस्थित होती. पत्नी ॲलिसा हिलीच्या पाठिंब्याने मिचेल स्टार्कने दमदार कामगिरी केली. स्टार्कने हैदराबाद विरुद्ध 4 षटकांत 34 धावा देत 3 बळी घेतले. त्याच्या गोलंदाजीच्या बळावर कोलकाताने हैदराबादला माफक धावांवर रोखले आणि नंतर 13.4 षटकांत आव्हान पार करून फायनल गाठली. मिचेल स्टार्कला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीबद्दल 'सामनावीर' निवडण्यात आले. पत्नी एलिसा चिअर करायला आल्यापासून स्टार्कची कामगिरी अधिकच सुधारली.
3 मे रोजी एलिसा सामना पाहायला आली तेव्हा स्टार्कने मुंबई इंडियन्स विरूद्ध ४ बळी घेतले होते. तर काल तिच्या उपस्थितीत त्याने ३ बळी घेत दमदार कामगिरी केली. मिचेल स्टार्कने सनरायझर्स हैदराबाद (SRH) फलंदाज ट्रॅव्हिस हेड (0), नितीश रेड्डी (9) आणि शाहबाज अहमद (0) यांना बाद केले होते. स्टार्कला कोलकाताने IPL इतिहासातील सर्वात महाग बोली लावून 24.75 कोटी रुपयांना विकत घेतले होते. पण त्याने त्याच्या किमतीला आणि लौकिकाला साजेसा खेळ केला नव्हता. आता मात्र हळूहळू त्याला सूर गवसल्याचे दिसत आहे. तसेच, पत्नी एलिसाचे लेडी लक देखील त्याला फायद्याचे ठरताना दिसत आहे.