Join us

'लेडी सेहवाग'ची बॅट तळपली! Shafali Verma चा धमाकेदार शो; अवघ्या ३ धावांनी हुकलं 'द्विशतक'

कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे टीम इंडियातून गमावलं स्थान, आता पुन्हा ठोठावलं दार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 15:07 IST

Open in App

 Shafali Verma missed her Double Century by just 3 runs सीनियर वुमन्स वनडे ट्रॉफी स्पर्धेतील क्वार्टर फायनलच्या लढतीत लेडी सेहवाग नावाने ओळखली जाणारी भारतीय क्रिकेटर शफाली वर्माचा धमाकेदार शो पाहायला मिळाला. या स्पर्धेत हरयाणा संघाचे नेतृत्व करणाऱ्या शफालीनं बंगाल विरुद्धच्या लढतीत तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश केला. तिचे द्विशतक अवघ्या ३ धावांनी हुकले. कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे टीम इंडियातून डच्चू मिळालेल्या शफालीनं दमदार खेळीसह पुन्हा टीम इंडियाचे दरवाजे ठोठावले आहेत. बंगालविरुद्धच्या सामन्यात ११५ चेंडूत शफालीनं  २२ चौकार आणि ११ षटकारांच्या मदतीने १९७ धावांची खेळी केली. 

चौकार-षटकारांची 'बरसात'

क्वार्टर फायनलच्या लढतीत बंगाल विरुद्धच्या सामन्यात हरयाणाचा संघ पहिल्यांदा बॅटिंगसाठी मैदानात उतरला होता. शफालीनं संघाच्या डावाची सुरुवात करताना ३९ व्या षटकापर्यंत मैदानात थांबून चौकार-षटकारांची अक्षरश: बरसातच केली. १९७ धावांपैकी १५४ धावा तिने बाउंड्रीच्या रुपात आपल्या खात्यात जमा केल्या. सिंगलच्या रुपात तिने ४३ धावा काढल्या. तिने १७० पेक्षा अधिक स्ट्राइक रेटनं धावा काढल्या.

वर्षभरात अपयशाचा पाढा  

शफाली वर्मा ही भारतीय महिला संघातील  स्टार बॅटर आहे. भारतीय संघाच्या डावाला सुरुवात करण्याची जबाबदारी ती पार पाडताना पाहायला मिळाले. पण मागील काही दिवसांपासून ती संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडताना दिसते. न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतील तिने ३ डावात फक्त ५६ धावा केल्या होत्या. या वर्षभरात तिने ६ सामन्यात फक्त १०८ धावा केल्या. यात ३३ ही तिची सर्वोच्च धावसंख्या होती.

देशांतर्गत स्पर्धेतील धमाकेदार शोसह पुन्हा ठोकला शड्डू

कामगिरीच्या सातत्याच्या अभावामुळे तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. पण आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाकेदार शोसह आपल्यातील ताकद दाखवून देत तिने पुन्हा एकदा टीम इंडियात एन्ट्री मारण्यासाठी शड्डू ठोकल्याचे दिसते. 

टॅग्स :शेफाली वर्माभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघहरयाणा