सध्या सुरू असलेल्या आयसीसी विश्वचषक २०२३ मध्ये श्रीलंकेच्या संघाला दुखापतीचे ग्रहण लागल्याचे दिसते. कारण आता आणखी एक खेळाडू दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर झाला आहे. नियमित कर्णधार दासुन शनाका यापूर्वीच स्पर्धेबाहेर झाला आहे. इंग्लंडविरुद्धच्या विजयात मोलाची भूमिका बजावणारा लाहिरू कुमारा उर्वरित स्पर्धेला मुकणार आहे. त्याने इंग्लंडविरूद्ध चमकदार कामगिरी करताना जोस बटलर, लियाम लिव्हिंगस्टोन आणि बेन स्टोक्स यांना तंबूत पाठवले होते.
त्याने चालू विश्वचषकात चार सामन्यांत पाच बळी घेतले आहेत. अफगाणिस्तानविरुद्ध श्रीलंकेच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी पुण्यात सराव करताना लाहिरू कुमाराच्या डाव्या मांडीला दुखापत झाली. त्यामुळे तो उर्वरित विश्वचषकाला मुकला आहे. त्याच्या जागी दुष्मंथा चमीराचा संघात समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, वन डे विश्वचषक २०२३ मध्ये श्रीलंकेने आतापर्यंत ५ पैकी २ सामने जिंकले आहेत आणि कुसल मेंडिसच्या नेतृत्वाखाली संघ ३० ऑक्टोबर रोजी आपला पुढील सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे. श्रीलंकेने आपल्या शेवटच्या सामन्यात इंग्लंडचा ८ गडी राखून पराभव केला होता. त्या सामन्यात लाहिरू कुमाराने सात षटकांत ३५ धावा देत ३ बळी घेतले होते. याआधी त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात संधी मिळाली होती, ज्यामध्ये एकही बळी घेण्यात यश आले नाही.