दुबई : भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि समालोचक वीरेंद्र सेहवागच्या नावावर काल क्रिकेटमध्ये एक नकोसा असा विक्रम जमा झाला आहे. ज्या क्रिकेट प्रकारासाठी सेहवाग विशेष करून ओळखला जातो त्याच मर्यादित षटकांच्या परंतु नव्याने सुरु झालेल्या टी-10 प्रकारात पहिल्याच सामन्यात तो 0 धावांवर बाद झाला आहे. 2003 मध्ये सेहवाग लेसिस्टरशायरकडून 16 जून 2003 रोजी जो टी-20 सामना खेळला होता त्यातही खातं खोलण्यात तो अपयशी ठरला होता. त्यामुळे टी20 आणि टी10 मध्ये पदार्पणातच शून्यावर बाद होणारा सेहवाग पहिलाच खेळाडू बनला आहे.
39 वर्षीय सेहवाग हा या लीगमध्ये मराठा अरेबियंस टीम संघाचा कर्णधार आहे. खेळाडू आणि कर्णधार म्हणून काल त्याचा पहिलाच सामना होता. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सेहवागला शाहिद आफ्रिदीने पहिल्याच चेंडूवर बाद केलं, सेहवागच्या विकेटसह आफ्रिदीने या सामन्यातील हॅट्रीक देखील साजरी केली.
विरेंद्र सेहवागचा मराठा अरेबियन्स आणि आफ्रिदीच्या पख्तुन्वा या संघात हा सामना रंगला. आपल्या पहिल्याच टी-10 सामन्यात हॅट्रिक घेणारा आफ्रिदी पहिलाच खेळाडू बनला आहे. शाहिद आफ्रिदीच्या दमदार गोलंदाजीच्या बळावर मराठा अरेबियन्सचा पख्तून्स 25 धावांनी पराभव केला. आफ्रिदीनं पाचव्या षटकात रोसोऊ, ड्वेन ब्रावो आणि कप्तान वीरेंद्र सहवागला बाद करत हॅट्ट्रिक केली. प्रथम फलंदाजी करताना पख्तून संघानं दहा षटकात चार गड्यांच्या मोबदल्यात 121 धावा केल्या होत्या. 122 धावांचा पाठलाग करताना सेहवागच्या मराठा अरेबियन्सनला दहा षटकांत 96 धावांपर्यंतच मजल मारता आली.
क्रिकेटच्या मैदानात कालपासून (गुरुवार) टी-10 लीगच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली. टी-20 सामन्याची लोकप्रियता पाहता या नव्या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आयोजकांना आशा आहे. टेन क्रिकेट लीग नावाने या स्पर्धेला सुरुवात झाली असून, 14 डिसेंबर ते 17 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत 6 संघ सहभागी आहेत. तीन दिवसात 10 षटकांचे 13 सामने खेळवण्यात येणार आहेत. सर्व सामने शारजाच्या मैदानात रंगणार आहेत.
Web Title: Lajirwana Vikrama was named in the name of striker Virender Sehwag
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.