मुंबई: भारताचे आणि मुंबईचे माजी फलंदाज लालचंद राजपूत यांनी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी मंगळवारी अर्ज दाखल केला आहे.
त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी टीम इंडियासारख्या प्रतिभाशाली टीमचा प्रशिक्षक झालो तर स्वत:ला खूप अभिमान वाटेल. सध्या टीम इंडिया उत्तम खेळ करत असून तिला फक्त योग्य दिशा द्यायची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे मला 20 वर्षं विविध स्तरावरच्या प्रशिक्षकाचा अनुभव आहे. तसेच मी एकमात्र भारतीय आहे की ज्याने झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान सारख्या आंतरराष्ट्रीय टीमचा प्रशिक्षकाचा कारभार सांभाळला आहे.
लालचंद राजपूत हे मे महिन्यापासून झिम्बाब्वे टीमचे प्रशिक्षकाचे पद सांभाळत होते. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC)ने झिम्बाब्वे क्रिकेटवर निलंबनाची कारवाई केल्याने त्यांचे पद गेले. त्याचप्रमाणे महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने 2007चा पहिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. तसेच 2008 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये तिरंगी मालिका जिंकली होती. त्यावेळी राजपूत हे टीमच्या व्यवस्थापकपदाचा कारभार सांभाळत होते.
वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर टीम इंडियाच्या प्रशिक्षक बदलाच्या हालचालींनी जोर धरला आहे. गेल्या काही दिवसांत आधीच भारताचा अष्टपैलू खेळाडू रॉबिन सिंह यानं देखील मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयकडे अर्ज दाखल केला होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) मुख्य प्रशिक्षकासह अन्य महत्त्वाच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पण, तत्पूर्वी कार्यरत असलेल्या प्रशिक्षकांना आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत 45 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. या दौऱ्यानंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षकांच्या फळीत बरेच बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.