Join us  

लाराचा वेस्ट इंडिजच्या माजी खेळाडूंवर घणाघात, वाचला अखिलाडूवृत्तीचा पाढा  

जागतिक क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक असलेल्या ब्रायन लाराचे त्याचे सहकारी खेळाडू आणि माजी क्रिकेटपटूंशी म्हणावे तसे चांगले संबंध कधीच राहिले नाहीत. आता लाराने पुन्हा एकदा आपल्या पूर्वसुरींवर जोरदार टीका करताना त्यांच्या अखिलाडूवृत्तीचा पाढाच वाचला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2017 8:08 PM

Open in App

लंडन, दि. ६ -  जागतिक क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक असलेल्या ब्रायन लाराचे त्याचे सहकारी खेळाडू आणि माजी क्रिकेटपटूंशी म्हणावे तसे चांगले संबंध कधीच राहिले नाहीत. आता लाराने पुन्हा एकदा आपल्या पूर्वसुरींवर जोरदार टीका करताना त्यांच्या अखिलाडूवृत्तीचा पाढाच वाचला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील वर्चस्व उतरणीला लागल्यावर वेस्ट इंडिजच्या दिग्गज खेळाडूंनी अनेकदा खिलाडूवृत्तीला साजेसा खेळ केला नाही, अशी टीका लाराने एमसीसीमध्ये कॉलिन कौड्रे लेक्चरला संबोधित करताना केली. यावेळी लाराने खेळाची अखंडता कायम राखण्याचे आवाहनही आघाडीच्या संघांना केले. लॉर्ड्सवर होणाऱ्या एमसीसी स्प्रिट ऑफ क्रिकेट लेक्चरमधील कॉलिन कौड्रे लेक्चरला संबोधित करण्यासाठी ब्रायन लाराला निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना लाराने आपल्या पूर्वसुरींवर थेट टीका करत त्यांच्या अखिलाडूवृत्तीचे धिंडवडे काढले.एकेकाळी वेस्ट इंडिजकडे दर्जेदार फलंदाज आणि गोलंदाजांची फौज होती त्यांच्या जोरावर त्यांनी क्रिकेटमध्ये हुकूमत राखली होती. मात्र जगभरातील इतर संघ जेव्हा त्यांना टक्कर देऊ लागले तेव्हा या संघातील अनेक महान खेळाडूंनीही अखिलाडूवृत्तीने खेळण्यास मागेपुढे पाहिले नाही.  लारा म्हणाला, "१९८० आणि १९९०च्या दशकात वेस्ट इंडिजच्या संघाची चांगली कामगिरी होत होती. तेव्हा असे अनेक प्रसंग आले ज्यावेळी संघाच्या रणनीतीला अपेक्षित यश मिळू शकले नाही." यावेळी १९८९ च्या न्यूझीलंड दौऱ्यातील एक प्रसंगही लाराने सांगितला. तेव्हा कॉलिन क्रॉफ्टसोबत झालेल्या बातचितीनंतर मायकेल होल्डिंगने पंचाना खांदा मारला होता. कॉलिन क्रॉफ्टने फ्रेड गुडालसोबत केलेल्या गैरवर्तनाबाबत काही सांगितले होते. त्यानंतर मायकेल होल्डिंगने आपण क्रिकेटन नाही तर फुटबॉलपटू आहोत असा समज करून घेत स्टम्पवर लाथ मारली होती. या घटनेचा तेव्हा क्रिकेट जगतावर मोठा परिणाम झाला होता.  वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी एकदा नव्हे तर अनेकदा अखिलाडूवृत्ती दाखवली. १९८८ साली पाकिस्तानच्या दौऱ्यात वेस्ट इंडिजच्या संघाने पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फायदा उठवत विजय मिळवला होता. एका सामन्यात व्हीव रिचर्डस् इम्रान खानच्या गोलंदाजीवर पायचित झाला होता. तर अब्दुल कादिरच्या गोलंदाजीवर जेफ्री दुजॉ झेलबाद झाला होता. पण पंचांच्या मेहरबानीने ते खेळत राहिले.   लाराने १९९० मधील इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेचीही आठवण सांगितली. त्या  मालिकेत विंडिजच्या थाकथित दिग्गज खेळाडूंनी केलेला खेळ ही माझ्यासाठी जगातील सर्वात वाईट बाब होती. याच दौऱ्यात बार्बाडोस कसोटीत रॉब बेली या इंग्लंडच्या फलंदाजाला वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी खोटे अपील करून बाद ठरवले, असा गौप्यस्फोट लाराने केला. लारा पुढे म्हणाला, "या अखिलाडूवृत्तीमुळेच वेस्ट इंडिजचे पुढील काळात पतन झाले. इंग्लंड आणि पाकिस्तानवर अखिलाडूवृत्तीने मिळवलेल्या विजयामुळे संघाला आपल्या चुका सुधारण्याची संधी मिळाली नाही. १९९५ नंतर वेस्ट इंडिज क्रिकेटच्या पतनास सुरुवात झाली. मात्र या संघाचे खरे पतन तेव्हाच सुरू झाले होते जेव्हा संघातील महान खेळाडू अशा प्रकारची अखिलाडूवृत्ती दाखवत होते." परवा लिड्सवर इंग्लंडच्या मजबूत संघाला पराभूत करणाऱ्या वेस्ट इंडिजच्या जिगरबाज संघाचे मात्र लाराने कौतुक केले आहे.   

टॅग्स :क्रिकेट