- ललित झांबरे
जळगाव : गेल्या काही वर्षांत पुरुषांइतकाच महिला क्रिकेटचा बोलबोला आहे. २००५ मध्ये महिला क्रिकेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) च्या छत्राखाली आल्यापासून स्थिती फार बदलली आहे.
महिला क्रिकेटला जवळपास पुरुषांच्या बरोबरीने प्रसिद्धीसुद्धा मिळतेय, सामन्यांची संख्यासुद्धा वाढली आहे. ऊलट पुरुषांपेक्षा अधिक संख्येने महिला टी-२० क्रिकेट खेळताहेत, मात्र यात महिलांचे कसोटी क्रिकेट कुठे आहे? कुठेच नाही, वस्तुस्थिती अशी आहे की महिलांचे कसोटी क्रिकेट अक्षरश: अखेरच्या घटका मोजत आहे. कारण, आयसीसीचे धोरण!
महिलांच्या कसोटी क्रिकेटमध्ये पाहिजे तशी गुणवत्ता राहिलेली नाही आणि लोकप्रियतासुद्धा नाही म्हणून आयसीसीने महिलांचे कसोटी सामने बंदच केले असून फक्त मर्यादित षटकांचे वन डे आणि टी२० सामन्यांचे आयोजन सुरू ठेवले आहे. महिला क्रिकेटमध्ये कसोटी सामने १९३४ पासून, एकदिवसीय सामने १९७३ पासून आणि टी२० सामने २००४ पासून खेळले जात आहेत.
नोव्हेंबर २०१७ पासून महिलांचा एकही कसोटी सामना खेळला गेलेला नाही आणि भारतीय महिलांनी २०१४ पासून कसोटी सामना खेळलेला नाही. गेल्या १० वर्षांत महिलांचे फक्त आठच कसोटी सामने खेळले गेलेले आहेत मात्र याच काळात महिलांनी साडेचारशेच्या वर वन डे आणि पाचशेच्या वर टी-२० सामने खेळले आहेत. यावरून आयसीसीचे महिला क्रिकेटबाबत प्राधान्य कशाला आहे ते स्पष्ट दिसून येते.
आयसीसीच्या महिला समितीने आगामी दौऱ्यांच्या कार्यक्रमात कसोटी सामन्यांना स्थानच दिलेले नाही. शुभांगी कुलकर्णी व बेलिंडा क्लार्कसारख्या नावाजलेल्या खेळाडू असलेल्या समितीने हा निर्णय घेतला आहे. महिलांच्या कसोटी क्रिकेटला पुरेसे दर्शक मिळत नाहीत, पर्यायाने उत्पन्नही मिळत नाही, शिवाय मर्यादित षटकांच्या खेळाच्या तुलनेत महिलांच्या कसोटी क्रिकेटचा दर्जा तेवढा चांगला नाही, अशी यामागची कारणमीमांसा करण्यात आली आहे.
२०१७ मध्ये इंग्लंड व आॅस्ट्रेलियन महिला शेवटचा कसोटी सामना खेळल्या. याव्यतिरिक्त इतर संघांपैकी भारताने २०१४, नेदरलँडने २००७, न्यूझीलंड, पाकिस्तान व वेस्ट इंडिजने २००४, आयर्लंडने २००० आणि श्रीलंकन महिलांनी १९९८ पासून एकही कसोटी सामना खेळलेला नाही. याउलट गेल्या १० वर्षांतील टी-२० सामन्यांची तुलना केली तर आॅस्ट्रेलिया (पुरुषांचे सामने ९९/ महिलांचे सामने ११२), इंग्लंड (९१/१०९), न्यूझीलंड (९८/१०७), वेस्ट इंडिज (९७/ ११२) यांच्या पुरुषांपेक्षा महिलांनी अधिक टी-२० सामने खेळले आहेत. इतर संघांचेही टी-२० सामने पुरुषांच्या जवळपास बरोबरीनेच आहेत. पण कसोटी सामन्यांमध्ये हीच तफावत जमीन-अस्मानाएवढी मोठी आहे.