नवी दिल्ली : आपल्या अखेरच्या सामन्यात खास कामगिरी व्हावी, असे प्रत्येकाला वाटत असते. पण प्रत्येकाच्या नशिबी आपल्या अखेरच्या सामन्यात नेत्रदीपक कामगिरी करणे नसते. तर काही खेळाडू आपल्या अखेरच्या सामन्यात असा काही इतिहास लिहून जातात की त्यांना त्यानंतर कुणी विसरत नाही. अशीच एक गोष्ट आज घडली आहे. ही गोष्ट श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यादरम्यान घडली.
श्रीलंकेचा फिरकीपटू रंगना हेराथने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर निवृत्त होणार असल्याचे सांगितले होते. या सामन्यामध्येच हेराथने एक अनोखा विक्रम केला आहे. हा विक्रम करताना त्याने श्रीलंकेचा माजी महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनशी बरोबरी केली आहे.
इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील पहिला सामना गॉल या मैदानात आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी हेराथने एक बळी मिळवला. हेराथने इंग्लंडचा कर्णधार जो रुटला त्रिफळाचीत करत श्रीलंकेला मोठा दिलासा मिळवून दिला. या एका बळीसह या मैदानात शंभर बळी मिळवण्याचा विक्रम हेराथने आपल्या नावावर केला आहे.