नवी दिल्ली : काही लोकं कधीही हार मानत नाहीत. असाच तो एक गोलंदाज. तो जेव्हा भारतीय संघात आला तेव्हा त्याने साऱ्यांची मनं जिंकली होती. आपल्या स्विंग गोलंदाजीने त्याने अनेकांना भूरळ पाडली होती. पण सध्याच्या घडीला तो भारतीय संघाबाहेर आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये भारताकडून तो एकही वनडे सामना खेळलेला नाही. काही जणांनी त्याची कारकिर्द संपुष्टात आली, असे म्हटलेही, पण त्याने मात्र हार मानलेली नाही. अजूनही आपल्याला भारतीय संघात स्थान मिळेल, ही त्याला आशा आहे.
भारताचा चांगला स्विंग गोलंदाज, अशी त्याची ख्याती होती. आपल्या स्विंगच्या जोरावर त्याने भल्या-भल्या फलंदाजांना खेळपट्टीवर नाचवले होते. पण कालांतराने त्याला फलंदाज बनवण्याचा मोह भारताच्या माजी प्रशिक्षकांना आवरता आला नाही. त्यांनी त्याच्या फलंदाजीवर भर दिला. या गोष्टीचा परिणाम त्याच्या गोलंदाजीवर झाला. त्यानंतर काही काळात त्याच्या गोलंदाजीतील स्विंग हरवला आणि त्याला भारतीय संघातून बाहेर काढण्यात आले. ही गोष्ट आहे ती इरफान पठाणची.
इरफान आणि त्याचा भाऊ युसूफ यांनी पंजाबमध्ये क्रिकेटची अकादमी सुरु केली आहे. या अकादमीचे उद्घाटन करण्यासाठी इरफान तेथे गेला होता. यावेळी तो म्हणाला की, " भारतीय संघात मला अजूनही स्थान मिळू शकते. याबाबत मी आशावादी आहे. त्याचबरोबर मी नियमित सरावही सुरु ठेवला आहे. स्थानिक सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करून भारतीय संघात स्थान पटकावण्याचे माझे ध्येय आहे. "