क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ का म्हटलं जातं, याचा प्रत्यय अनेक सामन्यांमधून वारंवार येत असतो. ऑस्ट्रेलियातील स्थानिक क्रिकेट स्पर्धेमध्ये नुकताच एक उत्कंठावर्धक अंतिम सामना खेळवला गेला. या सामन्यामध्ये रोमांच उत्कंठेच्या शिखरावर पोहोचला होता. या सामन्यातील अखेरच्या षटकात जो थरार रंगला, तो पाहून क्रिकेटप्रेमी आश्चर्यचकीत झाले शेवटच्या षटकात विजयासाठी ४ धावांची गजर असताना तब्बल पाच विकेट्स पडल्या आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाने हा सामना अवघ्या एका धावेने जिंकला.
ऑस्ट्रेलियन वुमन्स नॅशनल क्रिकेट लीगचा अंतिम सामना शनिवारी टस्मानिया वुमन्स आणि साऊथ ऑस्ट्रेलिया स्कॉर्पियन्स यांच्यात रंगला. या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला. पावसामुळे मध्येच सामना थांबवावा लागला. त्यामुळे षटकेही कमी करण्यात आली.
या सामन्यात टस्मानिया वुमन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २६४ धावा फटकावल्या. संघाकडून एलिसा विलेनी हिने ११० धावांची खेळी केली. त्याशिवाय नाओमी स्टेनबर्गनेसुद्धा ७५ धावा काढल्या. त्यानंतर साऊथ ऑस्ट्रेलिया स्कॉर्पियन्सचा संघ आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरला. मात्र त्याचवेळी पावसाचा व्यत्यय आल्याने षटके आणि धावा कमी करून संघाला ४७ षटकांमध्ये २४३ धावांचे आव्हान देण्यात आले.
४६ व्या षटकापर्यंत साऊथ ऑस्ट्रेलिया स्कॉर्पियन्स संघ विजयाच्या मार्गावर होता. त्यांनी पाच बाद २३९ धावांपर्यंत मजल मारली होती. अखेरच्या षटकात त्यांना केवळ ४ धावांची गरज होती. तर त्यांच्या हातात पाच विकेट्स होत्या. त्यामुळे त्यांच्या विजयाची औपचारिकता बाकी होती. मात्र शेवटच्या षटकात सामन्याचे चित्र पालटले आणि टस्मानिया वुमन्स संघाने पाच विकेट्स काढल एका धावेने सामना जिंकला.
टस्मानियाकडून अखेरचं षटक सारा कोएटने टाकलं. तिने जादुई गोलंदाजी करत साऊथ ऑस्ट्रेलिया स्कॉर्पियन्सच्या जबड्यातून सामना अक्षरश खेचून आणला. या षटकात तिने अवघ्या दोन धावा दिल्या. तर तीन विकेट्स काढले. साऊथ ऑस्ट्रेलियाच्या दोन बॅटर्स धावचित झाल्या. त्यामुळे साऊथ ऑस्ट्रेलियाला एका धावेने पराभूत व्हावे लागले.
Web Title: Last over, four runs needed to win, but five wickets down, the only talk of a thrilling match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.