मुंबई : यंदाच्या Indian Premier League (IPL 2020) मध्ये तीन वेळच्या विजेत्या चेन्नई सुपरकिंग्जची (Chennai Superkings) कामगिरी अत्यंत्य धक्कादायक झाली. कोणाच्या ध्यानीमनीही नसताना या संघाला गुणतालिकेत अखेरच्या स्थानी समाधान मानावे लागले आहे. संघाच्या प्ले ऑफच्या आशा कधीच संपुष्टात आल्या असून स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच चेन्नई प्ले ऑफमध्ये खेळताना दिसणार नाही. आता चेन्नईचा ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) यानेही आपला पराभव मान्य केला असून, ‘आता आमच्याकडे अखेरचे वेदनादायक १२ तास शिल्लक राहिले असून याचा आम्ही पूर्ण आनंद घेऊ,’ अशी प्रतिक्रीया दिली आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचे सध्या १२ गुण असून सोमवारी किंग्ज ईलेव्हन पंजाबविरुद्ध जिंकल्यास त्यांचे १४ गुण होतील. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांचे प्रत्येकी १४ गुण आहेत. जर चेन्नईने आपले पुढील २ सामने जरी जिंकले, तरी त्यांचे १२ गुणच होतील.रविवारी चेन्नईने आरसीबीचा सहज विजय केला. यासह त्यांनी गुणतालिकेत आपले स्थान उंचावलेही. मात्र त्यानंतर राजस्थानने मुंबईचा पराभव केला आणि चेन्नई संघ पुन्हा एकदा तळाच्या स्थानावर गेला.
आरसीबीवर मिळवलेल्या विजयानंतर कर्णधार धोनीने सांगितले की, ‘चांगली कामगिरी न झाल्यानंतर नक्कीच दु:ख होते. आता या स्पर्धेत आमच्या अखेरचे १२ वेदनादायक तास उरलेत. पण आम्ही याचा पूर्ण आनंद घेऊ. यामुळे गुणतालिकेत आम्ही कुठे आहोत, याचा परिणाम होता कामा नये. जर तुम्ही क्रिकेटचा आनंद घेत नसाल, तर ते क्रूर आणि वेदनादायी होते. मी आमच्या युवा खेळाडूंच्या प्रदर्शनाने खूश आहे.’
युवा खेळाडूंनी कामगिरीत सातत्य ठेवावे असे सांगताना धोनी म्हणाला की, ‘आरसीबीविरुद्ध युवांनी केलेला खेळ अचूक होता. सर्वांनी आखलेल्या योजनेनुसार खेळ केला. आम्ही बळी घेतल्या आणि प्रतिस्पर्ध्यांना कमी धावसंख्येत रोखले.’