मुंबई : अफगाणिस्तान म्हटलं की युद्धच डोळ्यापुढे येतं. तिथे होणारे हल्ले, रक्तपात यामुळे तेथील नागरिकही वैतागले आहे. त्यांच्या आयुष्यात राम राहिलेला नाही. पण गेल्या 5-6 वर्षांमुळे त्यांचे आयुष्य बदलले आहे. अफगाणिस्तानातील लोकं हसायला शिकली आहेत आणि यासाठी कारणीभूत ठरले आहे ते क्रिकेट. अफगाणिस्तानमध्ये क्रिकेटमुळे अमुलाग्र बदल झाल्याचे फिरकीपटू रशिद खानने सांगितले.
एक गुणवान क्रिकेटपटू म्हणून रशिद नावलौकिकाला आला आहे. कारण गेल्या दोन वर्षांमध्ये त्याने आपील गुणवत्ता सिद्ध करून दाखवली आहे. आयपीएलपासून रशिदने आपली ओळख निर्माण केली. आयपीएलमध्ये खेळताना रशिदने आपल्या फिरकीच्या जोरावर भल्या भल्या फलंदाजांना पळता भूई थोडी केली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही रशिदने छाप पाडली होती.
आयपीएलमध्ये अफगाणिस्तानच्या खेळाडूंना संधी देण्यात आली होती. त्यामुळेच रशिद खान आणि मोहम्मद नबी यांना यंदाच्या आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना रशिदने या संधीचे सोने करून दाखवले आणि आपल्या फिरकीच्या जोरावर बऱ्याच फलंदाजांना नाचवले. पण हाच रशिद आता भारतासाठी डेकेदुखी ठरू शकतो.
आयपीएलमध्ये रशिदची कामगिरी नेत्रदीपक अशीच झाली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये 21.8च्या सरासरीने रशिदने 21 बळी मिळवले. आयपीएल खेळताना रशिदला भारतातील खेळपट्टी आणि वातावरणाचा चांगलाच अंदाज आला आहे. त्याचबरोबर आयपीएलमध्ये त्याने भारतीय फलंदाजी चांगलीच जोखली आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय फलंदाजांपुढे रशिदचे सर्वात दडपण असेल.
रशिद म्हणाला की, " गेल्या 5-6 वर्षांत अफगाणिस्तानमधील वातावरण बदलले आहे. पूर्वीसारखे चित्र आता दिसत नाही. आता लोकांच्या ओठांवर आम्हाला हसू दिसत आहे. एक क्रिकेटपटू म्हणून आमच्यासाठी ही गौरवास्पद गोष्ट आहे."