लंडन : भारताचा महान क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला जाण्याची शक्यता आहे. २००० ते २०२० या कालावधीमधील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च क्षणांमध्ये सचिनच्या एका छायाचित्राचा समावेश झाला आहे.
भारताने २०११ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव करत जेतेपद पटकावले होते. भारतीय संघातील खेळाडूंनी यावेळी सचिनला खांद्यावर उचलत मैदानाची फेरी मारली होती. यावेळी या दिग्गज खेळाडूच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. या क्षणाचा समावेश सर्वोत्कृष्ठ क्रीडा लॉरेन्स पुरस्काराच्या नामांकनामध्ये झाला आहे.
सचिन तेंडुलकरला सहकाऱ्यांनी खांद्यावर घेतलेल्या क्षणाला 'कॅरीड आॅन द शोल्डर्स आॅफ ए नेशन' असे शिर्षक देण्यात आले आहे. लॉरेन्स अकादमीचा सदस्य आणि आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉने सचिन तेंडुलकर संदर्भातील या क्षणाला क्रिकेटमधील सर्वोत्तम क्षण असल्याचे म्हटले आहे. १७ फेब्रुवारी रोजी बर्लिन येथे लॉरेन्स जागतिक क्रीडा पुरस्कार दिले जाणार आहेत. गेल्या २० वर्षातील (२०००-२०२०) सर्वोत्तम क्रीडा क्षण निवडण्यासाठी क्रीडा चाहते देखील मत देऊ शकतात. यासाठीचे मतदान १० जानेवारी ते १६ जानेवारी दरम्यान होणार आहे.
Web Title: Lawrence Sports Award: Sachin nominated for highest moment award
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.