Join us  

आयर्लंड दौऱ्यात लक्ष्मण मुख्य कोच, राहुल द्रविडला मिळणार विश्रांती

लक्ष्मण हे मागील आयर्लंड दौऱ्यात संघाचे मुख्य कोच होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 7:57 AM

Open in App

नवी दिल्ली : टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांना आयर्लंड दौऱ्यातून विश्रांती दिली जाणार आहे. त्यांच्याऐवजी व्हीव्हीएस लक्ष्मण हे मुख्य कोच असतील. द्रविड यांच्यासह फलंदाजी कोच विक्रम राठोड आणि गोलंदाजी कोच पारस म्हाम्ब्रे यांनादेखील विश्रांती दिली जाईल. ही जबाबदारी एनसीएतील कोचिंग स्टाफकडे सोपविली जाईल.

आयर्लंड दौरा १८ ऑगस्टपासून सुरू होईल. टीम इंडिया तेथे तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळेल. हार्दिक पांड्या या दौऱ्यात संघाचे नेतृत्व करेल, असे मानले जात आहे.  रोहित शर्मा, विराट कोहली आणि  रवींद्र जडेजासारखे वरिष्ठ खेळाडूदेखील दौऱ्यातून विश्रांती घेतील. ३१ ऑगस्टपासून आशिया चषकाचे आयोजन असून त्यानंतर सप्टेंबरमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची वन डे मालिका खेळली जाईल. ही मालिका आटोपताच ५ ऑक्टोबरपासून वन डे विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. हे व्यस्त वेळापत्रक लक्षात घेत कोचिंग स्टाफला शांतचित्ताने तयारी करण्यासाठी विश्रांती दिली जात आहे.

लक्ष्मण हे मागील आयर्लंड दौऱ्यात संघाचे मुख्य कोच होते. त्यांच्यासोबत यंदा सितांशू कोटक किंवा ऋषिकेश कानिटकर यांना फलंदाजी तर ट्रॉय कुले किंवा साईराज बहुतुले यांना गोलंदाजी कोच म्हणून पाठविले जाईल.वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला आयर्लंड दौऱ्यात संधी दिली जाईल, असे संकेत मिळाले आहेत. त्याने एनसीएत नेटमध्ये गोलंदाजी सुरू केली.  टी-२० सामना खेळण्याच्या दृष्टीने तो गोलंदाजीचा सराव करीत आहे.श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल हे देखील एनसीएत आहेत. अय्यरने नेटमध्ये फलंदाजीचा सराव सुरू केला. तो आशिया चषकापर्यंत फिट होण्याची शक्यता आहे. राहुलने अद्याप फलंदाजीचा सराव सुरू केलेला नाही.

टॅग्स :राहुल द्रविडभारतीय क्रिकेट संघ
Open in App