मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद यांना अनेकदा टीकेला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळेच सध्या त्यांना पर्याय म्हणून अन्य व्यक्तीचा शोध सुरु असून पुढील महिन्यात एक तारखेला होणाºया वार्षिक सर्वसाधरण सभेमध्ये निवड समितीचा नवा अध्यक्ष ठरविण्यात येण्याची शक्यता आहे. यामध्ये माजी भारतीय क्रिकेटपटू आणि दिग्गज समालोचक लक्ष्मण शिवरामाकृष्णन यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती मिळाली.
राष्ट्रीय निवड समितीचे विद्यमान अध्यक्ष प्रसाद यांचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात येणार आहे. त्यामुळेच सध्या त्यांच्या जागी शिवरामाकृष्णन यांचे नाव आघाडीवर येत आहे. विशेष म्हणजे तामिळनाडूकडून त्यांच्या नावाला मोठा पाठिंबा मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे बीसीसीआयच्या बैठकीमध्ये निवड समितीच्या निर्णयावर मुख्य चर्चा होईल. याशिवाय क्रिकेट सल्लागार समितीविषयीही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहेत.