मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 1999 साली कारगिलचे युद्ध झाले होते. या युद्धात भारताने बाजी मारली होती. त्यानंतर मात्र दोन्ही देशांमध्ये शांततेचे वारे वाहू लागले. भारताचे माजी पंतप्रधान यांनी 2004 साली दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यासाठी क्रिकेटचा मार्ग निवडला. या दौऱ्याला जाताना पंतप्रधान अटलबिहार वाजपेयी यांनी म्हटले होते की, ' खेल ही नहीं, दिल भी जीतिए'. वाजपेयी यांच्या या वाक्याचे भारताच्या लक्ष्मीपती बालाजीने तंतोतंत पालन केले.
भारतीय संघ 2004 साली पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. या संघात बालाजीचाही समावेश होता. बालाजीची गोलंदाजी शैली काहीशी भिन्न होती. पण त्याच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू पाहायला मिळायचे. त्याच्या स्मितहास्याचे पाकिस्तानचे प्रेक्षक दिवाने झाले होते. त्यामुळे जेव्हा बालाजी बॉलिंगचा रनअप सुरु करायचा तेव्हा चाहते 'बालाजी जरा धीरे चलो, बिजली खड़ी, यहां बिजली खड़ी' हे गाणं गायचे आणि स्टेडियममध्ये एकच हशा पिकायचा.
भारताचे माजी पंतप्रधान वाजपेयी यांनी 2004 साली दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यासाठी क्रिकेटचा मार्ग निवडला. पण क्रिकेटची मालिका खेळवण्यापूर्वी तिथे जाऊन पाहणी करण्याची जबाबदारी संघ व्यवस्थापक रत्नाकर शेट्टी यांच्याकडे देण्यात आली होती. संघाला जाण्यापूर्वी शेट्टी हे स्वत: पाकिस्तानमध्ये जाऊन सुरक्षेची पाहणी करायला गेले होते. यावेळी शेट्टी यांनी एअरपोर्ट, रस्ते, स्टेडियम्स, हॉटेल्स या ठिकाणी जाऊन सुरक्षेची पाहणी केली होती.
पाकिस्तानमध्ये जाऊन आल्यावर त्यांनी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना आपला अहवाल सादर केला. त्यावेळी वाजपेयी यांनी शेट्टी यांना सुरक्षेबाबत विचारणा केली. त्यावर शेट्टी म्हणाले होते की, " पाकिस्तानची जनता या दौऱ्याच्या बातमीने सुखावली आहे. त्यांच्यामध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. एअरपोर्ट, रस्ते आणि बऱ्याच सार्वजनिक ठिकाणांवर आपले (वाजपेयी यांचे) फोटो लावलेले पाहायला मिळाले." ही गोष्ट ऐकल्यावर वाजपेयी म्हणाले की, " आता तर पाकिस्तामध्ये निवडणूक लढवणे सोपे असेल."