ठळक मुद्देवॉर्नरने विश्वचषकातील आपल्या कामगिरीने सर्व विरोधकांना उत्तर दिले आहे. त्याने ७ डावात ४८ च्या सरासरीने २८९ धावा केल्या. ३ अर्धशतके ठोकली. वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद ८९ धावांची त्याची सर्वांत मोठी खेळी खेळली
नवी दिल्ली : आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात सनरायजर्स हैदराबादचे नेतृत्व काढून घेताच निराशेत वावरणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला दुसऱ्या टप्प्यात चक्क संघाबाहेर बसविण्यात आले होते. यावरून बरेच वादळ उठले. मात्र, काहीच दिवसांत युएईत झालेल्या टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका वठविणारा हा खेळाडू स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरला. ‘मला कमकुवत मानण्याची चूक करू नका,’असे संदेश त्याने स्वत:च्या खेळातून दिला आहे.
वॉर्नरने विश्वचषकातील आपल्या कामगिरीने सर्व विरोधकांना उत्तर दिले आहे. त्याने ७ डावात ४८ च्या सरासरीने २८९ धावा केल्या. ३ अर्धशतके ठोकली. वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद ८९ धावांची त्याची सर्वांत मोठी खेळी खेळली. टी-२० विश्वचषकाच्या शेवटच्या तीन डावात वॉर्नरने अनुक्रमे नाबाद ८९, ४९ आणि ५३ धावा केल्या म्हणजेच गरजेच्या वेळी त्याने स्वतःला सिद्ध केले. वॉर्नर आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा विदेशी फलंदाज आहे. त्याचा टी-२० रेकॉर्डही चांगला आहे. त्याने ३१२ सामन्यांमध्ये १०२५५ धावा केल्या आहेत. त्यात ८ शतके आणि ८४ अर्धशतकांचा समावेश आहे.. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक शतक आणि २० अर्धशतके झळकावली आहेत. वॉर्नरने आधीच आयपीएल लिलावात उतरणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याला लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नवीन आयपीएल संघांचा कर्णधार बनविले जाऊ शकते. वॉर्नरसाठी मागचे दोन महिने फारच कठीण राहिले. त्याची पत्नी कॅंडिस हिने पतीवर झालेले मानसिक अत्याचार व्यंगात्मक स्वरूपात मांडले आहेत. कॅंडिसने लिहिले,‘ खराब फॉर्म, वयोवृद्ध, मंदगती... असे हिणवले गेले.’ वॉर्नरला आयपीएल सामन्यासाठी एक दिवस तर स्टेडियममध्ये येण्यापासून रोखण्यात आले नंतर त्याला ‘डगआऊट’पासून दूर राहण्यास देखील सांगण्यात आले होते.
वाॅर्नरच्या क्षमतेवर विश्वास होता
जेतेपदानंतर एका पत्रकाराने वॉर्नरबाबत कर्णधार ॲरोन फिंच याला प्रश्न विचारला. वॉर्नर सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब जिंकेल अशी कुणी अपेक्षा केली नसावी? आपण त्याच्याकडून अशी अपेक्षा कशी काय बाळगली? हा तो प्रश्न होता. यावर फिंच म्हणाला,‘ वाॅर्नरकडून तुम्हाला अपेक्षा नसावी पण मला होती.
मी त्याची क्षमता जाणतो. कोच जस्टिन लॅंगर यांना मी स्पर्धेआधी सांगितले की वॉर्नर विश्वषचकात शानदार कामगिरी करेल. यातील एकही शब्द खोटा असेल तर लेंगर यांना विचारा! मी कोचला फोन करून डेव्हिड विश्वचषकात सर्वोत्कृष्ट कामगिरी करेल,असे वचन दिले होते. आयपीएलबाबत मात्र काही बोलू इच्छित नाही, कारण मी लीगमध्ये खेळत नाही.’
Web Title: Leadership snatched, out of the team! Warner pulled the trigger
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.