नवी दिल्ली : 2013च्या इंडियन प्रीमिअर लीगमधील ( आयपीएल) स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील आरोपी एस श्रीसंतला शुक्रवारी मोठा दिलासा मिळाला आहे. बंदी उठवल्यानंतर श्रीसंतला मैदानावर परतण्याचे वेध लागले आहेत. तो म्हणाला,''लिएण्डर पेस 42व्या वर्षी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकू शकतो, तर मी 36व्या वयात थोड क्रिकेट नक्कीच खेळू शकतो.'' भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) श्रीसंतवर लावलेली आजीवन बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे. श्रीसंतला या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे, पण त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयानेबीसीसीआयला या प्रकरणाचा पुन्हा अभ्यास करून तीन महिन्यांत निर्णय देण्यास सांगितले आहे.
न्यायाधीश अशोक भूषण आणि केएम जोसेफ यांनी हा निर्णय दिला आहे. 36 वर्षीय श्रीसंत गेली पाच वर्ष क्रिकेटपासून दूर आहे. श्रीसंतला मिळालेली ही शिक्षा कठोर असल्याचेही न्यायाधीशांनी नमूद केले. न्यायालयाच्या निर्णयानंतर वृत्तसंस्थेशी बोलताना श्रीसंत म्हणाला की,''इतक्या वर्षांनंतर आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलेय हे मलाही माहित नाही. गेली सहा वर्ष मी क्रिकेट खेळलेलो नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवत बीसीसीआय मला स्थानिक क्रिकेट खेळण्याची परवानगी देईल, अशी मी आशा बाळगतो. आता तरी मला शाळेच्या क्रिकेट ग्राऊंडवर जाऊन प्रशिक्षण देता येईल आणि तेव्हा तुला परवानगी नाही, असे मला कोण म्हणणार नाही. क्रिकेट हा माझे आयुष्य आहे आणि मला ते परत हवंय.''
श्रीसंत 2007च्या ट्वेंटी-20 आणि 2011च्या वन डे वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य होता. क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी वयाचं बंधन अडवू शकत नाही, असेही तो म्हणाला.''मला पुन्हा स्कॉटलंडमध्ये क्लब क्रिकेट खेळायचे आहे. गतवर्षी परवानगी न मिळाल्याने मला खेळता आले नव्हते. मी गेली सहा वर्षे प्रथम श्रेणी क्रिकेटही खेळलेलो नाही आणि त्यामुळे मला इंग्लंडमध्ये क्लब क्रिकेट खेळता येणार नाही.''
भज्जी, वीरू यांच्याशी कायम संपर्कश्रीसंतने 27 कसोटी, 53 वन डे आणि 10 ट्वेंटी-20 सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. बंदीच्या काळात श्रीसंतशी भारतीय संघातील काही खेळाडू सतत चर्चा करत होते. त्यात हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग, सुरेश रैना आणि रॉबीन उथप्पा यांचा समावेश होता.