मुंबई - वानखेडे स्टेडियमवर रविवारी भारत-न्यूझीलंडमध्ये मालिकेतील पहिला वनडे सामना सुरु असताना एका वेगळया घटनेने काही क्षणांसाठी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. न्यूझीलंडचा गोलंदाज अॅडम मीलनेच्या गोलंदाजीवर विराटने फाईन लेगला शानदार षटकार खेचला. यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी विराटच्या षटकाराला दाद दिलीच पण त्याचवेळी विराटचा हा षटकार एका हाताने झेलणा-या आयुष झिमरेचेही कौतुक केले.
सामन्याचे समालोचन करणा-या माजी क्रिकेटपटूंनीही आयुषवर कौतुकाचा वर्षाव केले. विराटने खेचलेला फटका सीमारेषेवर उभ्या असलेल्या कॉलीन मुनरोच्या डोक्यावरुन गेल्यानंतर आयुषने ज्या पद्धतीने तो चेंडू एका हाताने झेलला ते दृश्य खरोखरच लाजवाब होते. आयुष या सामन्यात सीमारेषेबाहेर बॉलबॉय म्हणून काम करत होता. विराट या षटकारानंतर 47 धावांवर पोहोचला.
बॉलबॉय म्हणून काम करताना तुम्हाला अनेक मोठया क्रिकेटपटूंना जवळून पाहण्याची संधी मिळते. त्यांच्याकडून शिकता येते. त्यामुळे अनेक उदयोन्मुख क्रिकेटपटू बॉल बॉयची जबाबादारी पार पाडण्यासाठी एका पायावर तयार असतात. मधल्या फळीत फलंदाजी करणारा आयुष डावखुरा फिरकी गोलंदाज आहे. त्याचा मुंबईच्या संभाव्य अंडर-16 संघातच समावेश होऊ शकतो.
मागच्या मोसमात मुंबईच्या अंडर-14 संघाकडून खेळताना त्याने 14 विकेट घेतल्या. महाराष्ट्राविरुद्ध 86 धावा आणि त्याने घेतलेल्या सहा विकेटमधून त्याच्या क्रिकेटमधल्या प्रतिभेची चुणूक दिसली. आयुष दुस-यांदा वानखेडेवर बॉलबॉय म्हणून काम करत होता. याआधी दोनवर्षांपूर्वी भारत-दक्षिण आफ्रिका सामन्याच्या दरम्यानही तो बॉलबॉय होता. मी सीमारेषेबाहेर उभा राहून कंटाळलो होते. चेंडू माझ्याकडे येतच नव्हता. कोहलीने तो फटका खेळण्याआधी मी व्यवस्थित पोझिशनही घेतली नव्हती. हे सर्व अकस्मात घडून आले असे आयुषने सांगितले. आयुषचे खुद्द विराट कोहलीनेही कौतुक केले. तो माझ्यासाठी खास क्षण होता असे आयुष म्हणाला. करीयरच्या 200 व्या वनडेमध्ये खेळताना विराटने शानदार शतक झळकावले. पण या सामन्यात भारताचा सहा विकेटने पराभव झाला. मालिकेत न्यूझीलंडचा संघ 1-0 ने आघाडीवर आहे.
२००व्या एकदिवसीय सामन्यात विक्रमी कामगिरी करताना विक्रमांचा ‘विराट’ डोंगरभारतीय कर्णधार विराट कोहलीने आपल्या २०० व्या एकदिवसीय सामन्यात विक्रमी कामगिरी करतानी एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक शतकवीरांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात कोहलीने कारकिर्दीतील ३१ वे शतक झळकावताना ऑस्टेÑलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग (३०) याला मागे टाकले. आता कोहलीच्या पुढे केवळ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (४९) याचा क्रमांक आहे.
पाँटिंगने ३७५ एकदिवसीय सामने खेळताना ३० शतके झळकावली होती. त्याचवेळी, कोहलीपुढे असलेल्या सचिनने ४६३ सामन्यांमध्ये ४९ शतके झळकावली आहेत. सचिन, कोहली आणि पाँटिंग यांच्यानंतर सर्वाधिक शतक झळकावणाºया फलंदाजांच्या यादीमध्ये सनथ जयसूर्या (२८), हाशिम आमला (२६), एबी डिव्हिलियर्स (२५) आणि कुमार संगकारा (२५) यांचा क्रमांक आहे.