नवी दिल्ली : गुणवत्ता ठासून भरलेली असतानाही संजू सॅमसनला सातत्याने भारतीय संघातून खेळविण्यासाठी डावलण्यात येत असल्याने क्रिकेट चाहते बीसीसीआयवर टीका करत आहेत. यावरुन सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचवेळी, आता चक्क आयर्लंडने सॅमसनला आपल्याकडून खेळण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे अनेकांनी बीसीसीआय सोडून आयर्लंडचा मार्ग धर, असा सल्लाही सॅमसनला दिला आहे.
सॅमसनने भारताकडून २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याला आतापर्यंत २७ सामने खेळता आले. जेव्हा कधी त्याने भारतीय संघातून मैदानात पाऊल ठेवले, त्या प्रत्येकवेळी त्याने आपली चमक दाखवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आयर्लंड क्रिकेटने संजू सॅमसनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्याकडून खेळण्याचा सल्ला दिला आहे. इतकेच नव्हे, तर त्याला आयर्लंडच्या प्रत्येक संघात खेळविण्याची हमीही देण्यात आली आहे. त्यामुळेच आयर्लंडच्या या ऑफरने सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे.
सॅमसनने सांगितले...आयर्लंडने संजू सॅमसनला आपल्याकडून खेळण्याची संधी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचप्रमाणे, सॅमसनने या संधीला नम्रपणे नकार दिल्याचीही माहिती मिळाली आहे. आयर्लंड क्रिकेटने दिलेल्या ऑफरसाठी सॅमसनने आभारही मानले. ‘मी केवळ, भारताकडूनच खेळेन. इतर कोणत्या संघाकडून खेळण्याचा मी विचारही करू शकत नाही.’