वेस्ट इंडिज दौऱ्यावरील दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने चांगलीच फटकेबाजी केली... रोहितने त्याच्या कसोटी कारकिर्दीतले सर्वात वेगवान अर्धशतक या कसोटीत ठोकून अन्य विक्रमही मोडले. रोहित अँड कंपनीने Bazball क्रिकेट सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण, भारतात ही शैली उपयोगी पडेल का, हा प्रश्न आहे. इंग्लंडने मुख्य प्रशिक्षकपदी ब्रेंडन मॅक्युलम व कर्णधारपदी बेन स्टोक्स विराजमान झाल्यानंतर Bazball स्टाईल ( आक्रमक) क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. महान खेळाडू कपिल देव ( Kapil Dev) यांच्यामते अधिकाधिक देशांनी कसोटी क्रिकेटमध्ये आक्रमक खेळ करायला हवे. १९८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे कर्णधार यांनी रोहित शर्मालाही ( Rohit Sharma) आक्रमक खेळ करण्याचा सल्ला दिला आहे.
''Bazball क्रिकेट मस्त आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या कसोटी मालिकेत आक्रमक क्रिकेट पाहायला मिळाले अन् मी मागील काही कालावधीत पाहिलेली ही चांगली मालिका होती. माझ्या मते क्रिकेट असंच खेळलं गेलं पाहिजे. रोहित चांगला फलंदाज आहे, परंतु त्याने आणखी आक्रमक खेळ करायला हवा. इंग्लंडचा संघ असा खेळ करतोय, मग आपण असं का खेळू शकत नाही, याचा विचार तुम्ही करत असाल. क्रिकेट खेळणाऱ्या सर्व देशांनी याचा विचार करायला हवा. सामना जिंकणे याला प्राधान्य असायला हवं, ड्रॉ करण्यावर नव्हे,''असे कपिल देव म्हणाले.
रोहित व विराट यांनी देशांतर्गत क्रिकेट खेळायला हवं...भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या मते रोहित व विराट यांनी देशांतर्गत क्रिकेट खेळायला हवं. ''देशांतर्गत क्रिकेट हे खूप महत्त्वाचे आहे. विराट कोहली व रोहित शर्मा यांनी किती देशांतर्गत क्रिकेट खेळले आहे किंवा सध्या भारतीय संघात असलेल्या अन्य टॉप खेळाडूने किती देशांतर्गत क्रिकेटला महत्त्व दिले आहे? माझ्या मते अव्वल खेळाडूंनी पुढील पिढीला प्रेरित करण्यासाठी देशांतर्गत क्रिकेटही खेळायला हवं,''असेही कपिल देव म्हणाले.