Join us  

बाप शेर, बेटा सव्वाशेर! शिवनारायण चंद्रपॉलच्या मुलाने ऑसी गोलंदाजांना चोपले, खणखणीत शतक झळकावले 

वेस्ट इंडिज संघाचा दिग्गज फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल ( Shivnarine Chanderpaul) याच्या खेळीचे आजही अऩेकजण चाहते आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 5:52 PM

Open in App

वेस्ट इंडिज संघाचा दिग्गज फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल ( Shivnarine Chanderpaul) याच्या खेळीचे आजही अऩेकजण चाहते आहेत. गोलंदाज चेंडू टाकण्यापूर्वी तीनही स्टम्प्स दाखवणे आणि त्यानंतर स्टम्प्स झाकून सुरेख फटके मारण्याची त्याची कला, साऱ्यांनाच जमण्यासारखी नाही. कसोटी क्रिकेटमध्ये तर त्याचा हात पकडणे अवघडच...  यष्टी घेत क्रिजवर मार्क बनवण्याची त्याची स्टाईल आजही अनेकांच्या चांगली लक्षात असेल आणि आज त्याच्या मुलाला खेळताना पाहून पुन्हा चंद्रपॉलच मैदानावर उतरला असा भास झाला. तेजनारायण चंद्रपॉल ( Tagenarine Chanderpaul ) डावखुरा फलंदाज आहे आणि वडिलांप्रमाणे क्रिजवर मार्क करण्यासाठी तोही बेल्सचा आधार घेताना दिसले.  

तेजनारायणची वेस्ट इंडिजच्या कसोटी संघात निवड केली गेली आहे आणि विंडीजचा संघ दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी विंडीजचा संघ येथे अध्यक्षित एकादश संघासोबत सराव सामना खेळत आहे. त्यात तेजनारायणने खणखणीत शतक झळकावले आहे. ३० नोव्हेंबरपासून वेस्ट इंडिज-ऑस्ट्रेलिया यांच्यातली पहिली कसोटी सुरू होईल. २६ वर्षीय तेजनारायण याला आजच्या सामन्यात नशिबानेही साथ दिली. यष्टीरक्षक जोश इंग्लिसकडून आणि स्लीपमध्येही त्याचे झेल सुटले.

अध्यक्ष एकादश संघाच्या पहिल्या डावातील ३२२ धावांचा पाठलाग करताना कर्णधार कार्लोस ब्रेथवेट व तेजनारायण यांनी ९४ धावांची भागीदारी केली. ब्रेथवेट ४७ धावांवर मार्क स्टेकेटीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर विंडीजचे तीन फलंदाज झटपट माघारी परतले. जोएल पॅरीसने विंडीजच्या एनक्रुमाह बोनरला शून्यावर माघारी पाठवले, तर टॉड मर्फीने विंडीजच्या डेव्हॉन थॉमस ( ८) व कायले मेयर्स ( ६) यांना बाद केले. पण, तेजनारायण एकाबाजूने खिंड लढवत होता आणि त्याने १२६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. यष्टीरक्षक जोशूआ डा सिल्वा याने ( २५) त्याला चांगली साथ दिली.

तेजनारायणने एका बाजूने दमदार खेळ सुरू करताना प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले शतक पूर्ण केले. अॅश्टन अॅगरला सलग चौकार खेचून त्याने तिहेरी धावांचा पल्ला ओलांडला. तेजनारायण २९३ चेंडूंचा सामना करताना १३ चौकार व १ षटकार खेचून ११९ धावांवर माघारी परतला. विंडीजच्या डावात षटकार खेचणारा तो एकमेव फलंदाज ठरला. विंडीजने दिवसअखेर ७ बाद २३४ धाव केल्या आहेत आणि अजूनही ८८ धावांनी पिछाडीवर आहेत.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

टॅग्स :वेस्ट इंडिजआॅस्ट्रेलिया
Open in App