Chris Gayle Meets PM Modi : आपल्या स्फोटक खेळीने अवघ्या जगाला प्रभावित करणारा वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल. आंतराष्ट्रीय क्रिकेटपासून आयपीएलसारख्या लोकप्रिय लीगमध्ये गेलने आपल्या खेळीने सर्वांची मने जिंकली. आता गेल पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या भेटीमुळे चर्चेत आला आहे. गेलने मोदींसोबतच्या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने मोदींना हात जोडून नमस्कार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जमैकाचे पंतप्रधान अँड्रयू होलनेस यांची दिल्लीतील हैदराबाद हाउस येथे बैठक झाली. यावेळी जमैकात जन्मलेला गेल हैदराबाद हाउसमध्ये मोदींना भेटला. यावेळी दोन्ही देशाच्या पंतप्रधानांनी एकमेकांना बॅट भेट म्हणून दिली.
होलनेस यांनी मोदींना भेट म्हणून दिलेल्या बॅटवर ख्रिस गेलची स्वाक्षरी होती. ४५ वर्षीय गेलने या भेटीचा व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्याने आनंद झाला. जमैका टू इंडिया... वन लव्ह. युनिव्हर्सल बॉस म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या गेलच्या या व्हिडीओवर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने कमेंटच्या माध्यमातून म्हटले की, गेलची ही शैली खरोखरच अप्रतिम आहे. भारतीयांकडून तुला खूप सारे प्रेम. खरे तर या संभाषणावेळी गेलने केलेला नमस्कार भारतीयांची मने जिंकून गेला.
पंतप्रधान होलनेस यांच्यासोबतच्या बैठकीनंतर मोदी म्हणाले की, भारत आणि जमैकामधील संबंध आपला इतिहास, लोकशाही मूल्ये आणि जनतेच्या मजबूत संबंधांवर आधारित आहेत. आमचे संबंध संस्कृती, क्रिकेट, राष्ट्रकुल स्पर्धा यांमुळे आहेत. आजच्या बैठकीत आम्ही सर्व क्षेत्रात आमचे सहकार्य मजबूत करण्यावर चर्चा केली आणि अनेक नवीन उपक्रमांवर प्रकाश टाकला. भारत आणि जमैकामधील व्यापार आणि गुंतवणूक वाढत आहे. जमैकाच्या विकास प्रवासात भारत नेहमीच विश्वासार्ह आणि वचनबद्ध विकास भागीदार राहिला आहे. या दिशेने आमचे सर्व प्रयत्न जमैकाच्या लोकांच्या गरजांवर आधारित आहेत. आय-टेक तसेच आयसीसीआर शिष्यवृत्तींद्वारे आम्ही जमैकाच्या विकास वाढीसाठी योगदान दिले आहे.