shaheen afridi, psl । नवी दिल्ली : सध्या कतारच्या धरतीवर लीजेंड्स लीग क्रिकेटचा (LLC 2023) थरार रंगला आहे. शाहिद आफ्रिदीच्या नेतृत्वातील आशिया लायन्सच्या संघाने गौतम गंभीरच्या नेतृत्वातील इंडिया महाराजाचा पराभव करून स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. तर पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) शाहिद आफ्रिदीचा जावई शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वात लाहोर कलंदर्सने मुल्तान सुल्तानचा पराभव करून सलग दुसऱ्यांदा किताब जिंकला. त्यामुळे जावयानंतर आता फायनल जिंकण्याचा नंबर आपला असल्याचे शाहिद आफ्रिदीने म्हटले आहे.
काल शनिवारी मुल्तान सुल्तान आणि लाहोर कलंदर्स यांच्यात पीएसएलचा अंतिम सामना पार पडला. लाहोर कलंदर्सने अंतिम सामन्यात मुल्लान सुल्तान्सवर 1 धावांनी विजय मिळवत यंदाच्या हंगामाचे विजेतेपद पटकावले. प्रथम फलंदाजी करताना लाहोरने 6 गड्यांच्या मोबदल्यात 200 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. 201 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुल्तानच्या संघाने देखील शानदार खेळी केली. मात्र, मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वातील मुल्तानचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 199 धावा करू शकला. त्यामुळे लाहोरच्या संघाने 1 धावांनी विजय मिळवून सलग दुसऱ्यांदा किताब उंचावला.
इंडिया महाराजा स्पर्धेतून बाहेर दरम्यान, लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये आशिया लायन्सच्या संघाने 85 धावांनी इंडिया महाराजाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या पराभवासह गौतम गंभीरच्या इंडिया महाराजाच्या संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. आता आफ्रिदीच्या नेतृत्वातील आशिया लायन्सचा अंतिम सामना वर्ल्ड जायंट्सविरूद्ध सोमवारी होणार आहे. वर्ल्ड जायंट्सचा संघ साखळी फेरीत सर्वाधिक सामने जिंकून थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता.
"जावयानं फायनल जिंकली आता आमचा नंबर"शाहिद आफ्रिदीचा जावई शाहीन आफ्रिदीने पीएसएलची फायनल जिंकल्यानंतर आफ्रिदीने एक मोठे विधान केले आहे. शोएब अख्तरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आफ्रिदीने म्हटले, "शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वात लाहोर कलंदर्सच्या संघाने पीएसएलची फायनल जिंकल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. जावयाने फायनल जिंकली आहे आता आपला नंबर आहे, आम्ही फायनल जिंकणे खूप गरजेचे आहे", असे शाहिद आफ्रिदीने सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"