स्फोटक फलंदाजीनं एक काळ गाजवणारा न्यूझीलंडचा स्टार बॅटर मार्टिन गप्टिल (Martin Guptill) सध्या लीजेंड्स लीग २०२४ च्या हंगामात धुमाकूळ घालताना दिसत आहे. या स्पर्धेत साउदर्न सुपरस्टार्सच्या (Southern Super Stars) ताफ्यातून खेळताना या किवी क्रिकेटरनं इरफान पठाणच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोर्णाक सूर्या ओडिशा (Konark Suryas Odisha) संघाविरुद्ध तुफानी शतक झळकावले. मार्टिन गप्टिलच्या दमदार शतकाच्या जोरावर साउदर्न सुपरस्टार्स संघान १९२ धावांचा पाठलाग करताना ८ विकेट्स राखून विजय नोंदवला.
शतकी खेळीतील षटकाराशिवाय अर्धशतकी खेळीत मारलेला सिक्सर चर्चेत, कारण
मार्टिन गप्टिल याने या सामन्यात ५४ चेंडूत ९० चौकार आणि ११ षटकारांच्या मदतीने १३१ धावा कुटल्या. त्याच्या या शतकी खेळीशिवाय याआधीच्या सामन्यात अर्धशतकी करताना त्याने मारलेला षटकार सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. हरभजन सिंग याच्या नेतृत्वाखालील मणिपाल टायगर्स (Manipal Tigers ) विरुद्धच्या सामन्यात गप्टिलनं २९ चेंडूत ६८ धावांची खेळी केली होती. त्याच्या या खेळीत ८ खणखणीत चौकारांसह ४ उत्तुंग षटकारांचा सामावेश होता. यातील त्याचा एक षटकार तर थेट कॉमेंट्री बॉक्सच्या काचा फोडणारा होता. ११ व्या सामन्यातील ९ व्या षटकात डॅन ख्रिश्चनच्या गोलंदाजीवर त्याने हा कडक षटकार मारला होता.
मार्टिन गप्टिलचा "आज कुछ तुफानी करते हैं" अन् सातत्यपूर्ण दमदार खेळीचा सिलसिला
लीजेंड्स लीग २०२४ च्या ११ व्या सामन्यात मनिपाल टायगर्स विरुद्धच्या सामन्यात साउदन सुपरस्टार्स संघाच्या डावाची सुरुवात करणाऱ्या मार्टिन गप्टिल याच्या तुफानी खेळीमुळे त्याच्या संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना १९२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भज्जीच्या नेतृत्वाखालील संघ १५२ धावांत आटोपला. मार्टिन गप्टिल याचा आज कुछ तुफानी करते है! या तोऱ्यातील अंदाज पुढच्या सामन्यातही पाहायला मिळाला. ज्यात त्याने इरफान पठाणच्या नेतृत्वाखालील कोर्णाक सूर्या ओडिशा शतकी खेळीचा समावेश होता.
मार्टिन गप्टिल नंबर वन
लीजेंड्स लीग २०२४ च्या हंगामात न्यूझीलंडचा स्टार अगदी धमाकेदार अंदाजात खेळताना दिसत आहे. ५ सामन्यात त्याने ६७.७५ च्या सरासरीनं २७१ धावा कुटल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो टॉपला आहे. यात एका अर्धशतकासह एका शतकाचा समावेश आहे.