Join us  

Legends League Cricket 2024 : गब्बरची फिफ्टी अन् शर्माचा विकेट्सचा 'सिक्सर'; यापेक्षा भारी ठरला डिसिल्वाचा 'जलवा'

या लीगमध्ये धवन गुजरात ग्रेट्स (Gujarat Greats) संघाचे नेतृत्व करताना दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 1:03 PM

Open in App

लीजेंड्स लीग २०२४ च्या हंगामातील चौथ्या सामन्यात भारताचा माजी क्रिकेटर शिखर धवन याचा धमाकेदार अंदाज पाहायला मिळाला. या लीगमध्ये धवन गुजरात ग्रेट्स (Gujarat Greats) संघाचे नेतृत्व करताना दिसत आहे. गब्बरनं दिनेश कार्तिक याच्या नेतृत्वाखालील साउदर्न सुपर स्टार्स (Southern Super Stars) विरुद्धच्या लढतीत दमदार अर्धशतकी खेळी केली. एवढेच नाही तर गुजरातच्या संघाकडून खेळणाऱ्या मनन शर्मानं या सामन्यात ६ विकेट्स घेतल्या. पण या दोघांचीही खेळी व्यर्थ ठरली. कारण  गुजरातच्या संघाला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

  गब्बरसमोर दिनेश कार्तिकच्या संघाने केली पहिल्यांदा बॅटिंग, डिसिल्वानं दाखवला जलवा

गुजरात ग्रेट्सचा कॅप्टन शिखर धवन याने या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील साउदर्न सुपर स्टार्स संघाने पहिल्यांदा बॅटिंग केलीय आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यानंतर चतुरंगा डिसिल्वा यानं आपल्या भात्यातील जादूई नजराणा पेश केला. त्याने २८ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने नाबाद ५३ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावरच संघाने निर्धारित २० षटकात ९ बाद १४४ धावांपर्यंत मजल मारली.

मनन शर्माचा विकेट्सचा 'सिक्सर'

गुजरातच्या ताफ्यातून खेळणाऱ्या मनन शर्मानं आपल्या ४ षटकांच्या कोट्यात १७ धावा खर्च करताना ६ गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. यात मार्टीन गुप्तिल २२ (२७), हॅमिल्टन मासाकाद्झा २०(१२), केदार जाधव १(५),  दिनेश कार्तिक १८(१९) या तगड्या आणि स्टार फलंदाजांचा समावेश होता. याशिवाय  चिराग गांधी आणि सुबोथ भाटी यांना तर मनन शर्मानं खातंही उघडू दिलं नाही.

शिखर धवनची फिफ्टी; मग केदार जाधवनं आणलं सामन्यात नवं ट्विस्ट

 शिखर धवन याने मोर्ने व्हॅनच्या साथीनं संघाच्या डावाला सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ४३ चेंडूत ६३ धावांची भागीदारी रचली. सलामी जोडीच्या या खेळीमुळे पहिल्या सात षटकांच्या खेळात सामना गुजरात ग्रेट्स संघाच्या बाजूनं झुकला होता. पण केदार जाधवनं ही जोडी फोडली अन् सामन्यात एक नवा ट्विस्ट निर्माण झाला. सलामी जोडी फुटल्यावर ठराविक अंतराने विकेट पडत असतान शिखर धवन याने अर्धशतक साजरे केले. पण तोही चतुरंगा डिसिल्वाच्या जाळ्यात फसला. धवन याने आपल्या खेळीत ३ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ४८ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. तो माघारी फिरल्यावर एकालाही मैदानात तग धरता आला नाही. परिणामी गुजरातचा संघ निर्धारित २० षटकात ९ बाद ११८ धावांपर्यंतच मजल मारू शकला. 

टॅग्स :शिखर धवनदिनेश कार्तिककेदार जाधवटी-20 क्रिकेट