Legends League Cricket, Brett Lee : कारकीर्दिच्या अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ब्रेट ली याला अखेरच्या षटकात ७ धावांचा बचाव करता आला नव्हता, परंतु १० वर्षांनंतर त्याच परिस्थितीत असलेल्या ब्रेट ली यानं कमाल केली. Legends League Cricket मध्ये गुरुवारी झालेल्या लढतीत वर्ल्ड जायंट्स संघानं ( World Giants) अटीतटीच्या सामन्यात इंडियन महाराजा ( India Maharajas) संघाला ५ धावांनी हार मानण्यास भाग पाडले. ६ चेंडूंत विजयासाठी ८ धावांची गरज असताना ब्रेट लीनं भन्नाट यॉर्कर टाकून केवळ दोन धावा दिल्या आणि दोन विकेट्सही मिळवून देताना वर्ल्ड जायंट्सच्या हातून निसटलेला सामना पुन्हा खेचून आणला. त्यामुळे चौकार-षटकारांचा पाऊस जरी या सामन्यात पडला असला तरी ब्रेट लीच्या अखेरच्या त्या षटकानं साऱ्यांचे लक्ष वेधले...
प्रथम फलंदाजी करताना वर्ल्ड जायंट्सनं ५ बाद २२८ धावा उभ्या केल्या. हर्षल गिब्स व फिल मस्टर्ड या जोडीनं भारतीय महाराजा संघाच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी केली. मस्टर्ड ३३ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ५७ धावांवर माघारी परतला. पण, गिब्सची फटकेबाजी सुरूच होती, त्यात केव्हिन ओ'ब्रायनची साथ त्याला मिळाली. या दोघांनीही झटपट ७१ धावांची भागीदारी करून संघाला दोनशे समीप नेले. केव्हिन १४ चेंडूंत ५ षटकारांसह ३४ धावांवर माघारी परतला. गिब्स शतक पूर्ण करेल असे चिन्ह होते, परंतु रजत भाटीयानं त्याची विकेट मिळवली. गिब्स ४६ चेंडूंत ७ चौकार व ७ षटकारांसह ८९ धावांवर माघारी परतला. अॅलबी मॉर्केल ( १६) व जाँटी ऱ्होड्स ( २०) यांनीही अखेरच्या षटकांत योगदान दिले.
प्रत्युत्तरात भारतानं सडेतोड उत्तर दिले. वासीम जाफर ( ४) व एस बद्रीनाथ ( २) लगेच बाद झाल्यानंतरही नमन ओझा व कर्णधार युसूफ पठाण संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले. युसूफ २२ चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह ४५ धावांवर माघारी परतला. त्यानंतर इरफान पठाणननं नमन ओझाला साथ दिली. १५व्या षटकात नमन बाद झाला. ५ धावांनी त्याचे शतक हुकले. त्यानं ५१ चेंडूंत ८ चौकार ७ षटकारांनी ९५ धावांची खेळी केली. अखेरच्या षटकात विजयासाठी ८ धावांची गरज असताना ब्रेट लीने पहिल्याच चेंडूवर इरफानची विकेट घेतली. त्याआधीचा चेंडू Wide टाकला होता. इरफान २१ चेंडूंत ३ चौकार व ६ षटकारांसह ५६ धावांवर माघारी परतला. दुसऱ्या चेंडूवर रजत भाटीयानं एक धाव घेतली. पण, पुढे दोन चेंडू निर्धाव टाकले. पाचव्या चेंडूवर भाटीया रन आऊट झाला अन् अखेरच्या चेंडूवर विजयासाठी ६ धावा हव्या असताना ब्रेट लीनं भारी यॉर्कर टाकला अन् वर्ल्ड जायंट्सला ५ धावांनी विजय मिळवून दिला.
Web Title: Legends League Cricket : Brett Lee defended 7 runs from the final over against Indian Maharajas, they loses by 5 runs against World Giants,Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.