लेहमन यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा, स्मिथला अश्रू अनावर

आॅस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक डेरेन लेहमन यांनी गुरुवारी प्रशिक्षकपदाचा राजीनामा देत संघाला नवा प्रशिक्षक मिळण्याची हीच योग्य वेळ असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 04:31 AM2018-03-30T04:31:41+5:302018-03-30T04:31:41+5:30

whatsapp join usJoin us
Lehmann resigns as head coach, Smith gets tears | लेहमन यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा, स्मिथला अश्रू अनावर

लेहमन यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा, स्मिथला अश्रू अनावर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सिडनी : आॅस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक डेरेन लेहमन यांनी गुरुवारी प्रशिक्षकपदाचा राजीनामा देत संघाला नवा प्रशिक्षक मिळण्याची हीच योग्य वेळ असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
चेंडू कुरतडल्याप्रकरणी संपूर्ण क्रिकेट विश्व ढवळून निघाले असून आॅस्ट्रेलियन क्रिकेटला पुन्हा एक मोठा धक्का बसला. लेहमन यांनी आॅस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला . दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथा आणि अंतिम कसोटी सामना हा त्यांचा अखेरचा सामना असेल. विशेष म्हणजे या प्रकरणी क्लीन चिट मिळाल्यानंतरही त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला.
एक वर्षाची बंदी घालण्यात आल्यानंतर सिडनीत पत्रकार परिषदेत स्टीव्ह स्मिथ भावुक झाला होता. त्याला असे पाहिल्यानंतरच आपण हा निर्णय घेतल्याचे लेहमन यांनी सांगितले. आॅस्ट्रेलिया क्रिकेटसाठी हा दुहेरी धक्का आहे. एकीकडे नव्या कर्णधाराचा शोध घ्यायचा आणि विश्वचषकासाठी संघ बांधणी करणारा नवा प्रशिक्षक शोधण्याची दुहेरी कसरत सीएला करावी लागणार आहे.
खेळाडूंना ‘गुड बाय’ म्हणणे सर्वात कठीण काम असल्याचे सांगून आपल्यावर कुठलेच दडपण नव्हते, तर वैयक्तिक निर्णय होता, असे लेहमन यांनी स्पष्ट केले.

मेगेलॉनने प्रायोजनपद काढले : क्रिकेट आॅस्ट्रेलियाच्या सर्वात मोठ्या प्रायोजकांपैकी एक असलेल्या मेगेलॉनने चेंडू कुरतडल्याच्या प्रकरणानंतर क्रिकेट आॅस्ट्रेलियासोबतचा प्रायोजन करार मोडित काढला आहे. याशिवाय क्रीडा साहित्य निर्मिती करणाऱ्या एएसआयसीएस या कंपनीने वॉर्नर आणि कॅमेरुन बेनक्रॉफ्ट यांच्याशी नाते तोडले. मेगेलॉनने आॅगस्ट २०१७ ला आॅस्ट्रेलियाच्या स्थानिक मालिकेसाठी तीन वर्षांचा दोन कोटी आॅस्ट्रेलियन डॉलरचा करार केला होता. तसेच एका आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने बुधवारी वॉर्नरला ब्रान्ड अ‍ॅम्बेसडर पदावरून दूर केले होते.

खोटे बोलल्याबद्दल बेनक्राफ्टचीही माफी
चेंडू कुरतडल्याप्रकरणी कॅमेरुन बेनक्राफ्टने माफी मागितली. मी खोटे बोललो, मला क्षणा करा..., स्वत:वरच आता चीड येत आहे, असे बेनक्राफ्टने म्हटले. झालेल्या चुकीचा पश्चात्ताप असून मला माफ करा. या गोष्टीचा मला आयुष्यभर पश्चात्ताप राहील.’
दरम्यान, इंग्लंड काऊंटी संघ सॉमरसेटने बेनक्रॉफ्टसह केलेला करारही मोडला. याविषयी अधिकृत माहिती देताना संघाचे निर्देशक अँडी हुर्रे यांनी म्हटले की, ‘विदेशी खेळाडूच्या नात्याने २०१८च्या मोसमात बेनक्रॉफ्ट सॉमरसेट संघातून खेळणार नाही.’

माफ करा, आवडत्या खेळाची बदनामी केली - वॉर्नर
ज्या खेळावर निस्सिम प्रेम केले त्याच खेळाला बदनाम केले. चेंडू कुरतडल्याप्रकरणी आवडत्या खेळाला डाग लावल्याबद्दल मला माफ करा, या शब्दात डेव्हिड वॉर्नरने चाहत्यांची माफी मागितली.

सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये तो म्हणाला, ‘माझ्या चुकीमुळे क्रिकेटला नुकसान झाले आहे. यासाठी माफी मागतो. मी काही वेळ एकांतात विचार करणार आहे. काही विश्वासू लोकांचा सल्ला घेतल्यानंतर पुन्हा सर्वांच्या समोर येईन.’

स्टीव्ह स्मिथ ढसढसा रडला, मागितली माफी
दरम्यान आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथ याने पत्रकार परिषदेत क्रीडाप्रेमींची आणि चाहत्यांची माफी मागितली. बोलताना भावना अनावर झाल्याने त्याच्या डोळ्यातून वारंवार पाणी वाहताना दिसले. भयंकर मोठी चूक केल्याचे मान्य केले. कर्णधार म्हणून केपटाऊन कसोटीत गेल्या शनिवारी जे काही घडले त्याबद्दल मीच दोषी असल्याचे तो म्हणाला. माझे क्रिकेटवर प्रेम असून यातून बाहेर पडू, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.
या प्रकरणापासून इतर खेळाडूंनी बोध घेतला तर काहीतरी चांगले निष्पन्न झाले असा याचा अर्थ होईल,असे तो म्हणाला. उर्वरीत आयुष्यभर ही चूक विसरणार नाही असेही स्टीव्हचे मत होते. काळ बदलेल आणि लोकांचे प्रेम तसेच आदर मला परत मिळेल , अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली.
क्रिकेट हा जगातील सर्वोत्कृष्ट खेळ असून ते माझे सर्वस्व आहे. माझे आयुष्यच क्रिकेट असून अपेक्षा आहे की पुन्हा मी क्रिकेटचा भाग होईल. ही घटना माझ्या नेतृत्वाचा पराभव असल्याचे स्मिथने साश्रूनयनांनी कबूल केले.

आॅस्ट्रेलियन क्रिकेटपटू बेशिस्त, उर्मट : आर्थर
सिडनी : माजी प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी आॅस्ट्रेलियाच्या खेळाडूंना बेशिस्त आणि घमेंडी संबोधले आहे. क्रीडा संस्कृती सुधारण्याची क्रिकेट आॅस्ट्रेलियाची मुळीच इच्छा नाही, असा आरोप त्यांनी केला. द.आफ्रिकेचे आर्थर यांना २०१३ च्या अ‍ॅशेस मालिकेआधी आॅस्ट्रेलियाने प्रशिक्षक पदावरून निलंबित
करीत लेहमन यांची नियुक्ती केली होती. आर्थर हे सध्या पाकचे प्रशिक्षक आहेत. चेंडू कुरतडणाºया आॅस्ट्रेलियाच्या खेळाडूंबद्दल त्यांनी एका संकेस्थळावर लिहिले की, ‘खेळाडूंची पिढी बदलली,
खराब वागणुकीबद्दल टीकाही झाली, पण आॅस्ट्रेलियन क्रिकेटची संस्कृती मात्र बदलली नाही. बदलण्याची त्यांची इच्छाशक्तीही नाही. मी गेल्या काही वर्षांपासून आॅस्ट्रेलियन खेळाडूंच्या बेशिस्त वर्तनावर नाराज आहे.’ (वृत्तसंस्था)

Web Title: Lehmann resigns as head coach, Smith gets tears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.