LEI vs IND : भारतीय संघाने सराव सामन्यातील पहिला डाव ८ बाद २४६ धावांवर घोषित केला आणि दुसऱ्या दिवशी लिसेस्टरशायर क्लबला फलंदाजीला यावे लागले. केएस भरतने नाबाद ७० धावांची खेळी करून इंग्लंडविरुद्धच्या कसोटीसाठी दावा सांगितला असला तरी रिषभ पंत हाच पहिली पसंती राहणार आहे. आज भरत शतक झळकावेल असे वाटले होते, परंतु रोहित शर्माने डाव घोषित केला. त्यानंतर मोहम्मद शमीने ( Mohammed Shami) यजमान लेसिस्टरशायर क्लबला दोन धक्के दिला.
शुबमन गिल ( २१), रोहित शर्मा ( २५), श्रेयस अय्यर ( ०), रवींद्र जडेजा ( १३) व विराट कोहली ( ३३) हे माघारी परतल्यानंतर केएस भरत व उमेश यादव यांनी झटपट ६६ धावांची भागीदारी करताना भारताला दोनशेपार नेले. भरतने जबाबदारीने खेळ करताना ९३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याला उमेशने २३ धावा करून चांगली साथ दिली. मोहम्मद शमीही सुसाट फटकेबाजी करताना दिसला. भरनेही अर्धशतकानंतर आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या ८ बाद २४६ धावा झाल्या होत्या. शमी १८ धावांवर नाबाद होता, तर भरतने १११ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह नाबाद ७० धावा केल्या होत्या.
भारताच्या ८ बाद २४६ धावांच्या प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या लिसेस्टरशायरला शमीने २२ धावांवर दोन धक्के दिले. कर्णधार सॅम इव्हान्स ( १) याला सातव्या षटकांत बाद केले. त्यानंतर ९व्या षटकात शमीने भारताच्याच पण, सराव सामन्यात लिसेस्टरशायरकडून खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराचा ( Cheteshwar Pujara) त्रिफळा उडवला. यानंतर पेव्हेलियनमध्ये जाणाऱ्या चेतेश्वरकडे शमी धावला अन् त्याला मिठी मारून सेलिब्रेशन केले.