भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याच्या आक्रमक स्वभावाची प्रतिस्पर्ध्यांना चांगलीच जाण आहे. पण, विराटच्या रागाचा सामना भारतीय चाहत्याला करावा लागला. इंग्लंड दौऱ्यावर असलेला भारतीय संघ चार दिवसीय सराव सामना खेळतोय. लिसेस्टरशायर क्लबविरुद्धच्या या सामन्यात भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना पहिल्या डावात अपयश आले, परंतु दुसऱ्या डावात त्यांनी चांगले कमबॅक केले. श्रीकर भरत ( KS Bharat) यांनी दोन्ही डावांत दमदार खेळ केला, तर विराट कोहली व रवींद्र जडेजा यांनी दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी करून भारताला ९ बाद ३६४ धावा उभारून दिल्या. भारताने ३६६ धावांची आघाडी घेतली आहे. दरम्यान विराट कोहली व प्रेक्षक यांच्यातील वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडीओत विराट कोहली ड्रेसिंग रुमच्या बालकनीतून प्रेक्षकाची शाळा घेताना दिसतोय... भारत-लिसेस्टरशायर यांच्यातल्या सराव सामन्याच्या तिसऱ्या दिवशी हा प्रसंग घडला. जेव्हा या चाहत्याने एका फोटोसाठी युवा गोलंदाज कमलेश नागरकोटी ( Kamlesh Nagarkoti) याच्यासोबत असभ्य वर्तवणूक केली. त्याचे हे वागणे विराटला खटकले आणि त्याची व चाहत्याची तू तू मैं मैं झाली. नागरकोटी हा भारताच्या कसोटी संघाचा सदस्य नाही, परंतु तो नेट बॉलर म्हणून संघासोबत लंडनला गेला आहे.
हा सामना पाहण्यासाठी मी ऑफिसमधून खास सुट्टी घेतलीय आणि मला नागरकोटीसोबत एक फोटो मिळायला हवा होता, असे चाहत्याचे म्हणणे आहे. तो सातत्याने नागरकोटीकडे फोटोसाठी मागणी करत होता. त्यावर कोहली म्हणाला, तो इथे मॅच खेळायला आलाय, फोटो काढायला नाही.
रोहित शर्माला कोरोनाची लागण झाल्यामुळे दुसऱ्या डावात केएस भरत व शुबमन गिल सलामीला आले आणि त्यांनी ६२ धावांची भागीदारी केली. भरतने ४३, तर गिलने ३८ धावा केल्या. त्यानंतर हनुमा विहारी व श्रेयस अय्यर हे अनुक्रमे २० व ३० धावांवर माघारी परतले. पहिल्या डावात ७० धावा करणाऱ्या भरतमुळेच भारताने २४६ धावांपर्यंत मजल मारली. कोहलीने पहिल्या डावात ३३, तर दुसऱ्या डावात ६७ धावा केल्या.
Web Title: LEI vs IND : Virat Kohli's vociferous argument with fan from dressing room balcony for troubling Nagarkoti with photo requests, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.