India Tour of England : भारतीय संघाचे आघाडीचे फलंदाज सराव सामन्यात ढेपाळले.. लिसेस्टरशायर क्लबविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा निम्मा संघ ८१ धावांवर माघारी परतला. रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, हनुमा विहारी हे फलंदाज २१ वर्षीय गोलंदाज रोमन वॉकर ( Roman Walker) च्या गोलंदाजीवर माघारी परतले. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु भारताची सुरूवात काही चांगली झाली नाही.
लोकेश राहुलने दुखापतीमुळे माघार घेतल्याने शुबमन गिलचे इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत सलामीला खेळणे पक्के झाले आहे. आजही तो रोहितसह सलामीला आला. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचा सुरेख सामना करताना गिलने काही चांगले फटकेही मारले. पण, १०व्या षटकात गिल व शर्मा यांची ३५ धावांची भागीदारी संपुष्टात आली. विल डेव्हिसच्या गोलंदाजीवर रिषभने यष्टिंमागे सुरेख झेल टिपला अन् गिल २१ धावांवर बाद झाला. त्यानंतर १६व्या आणि १८ व्या षटकात भारताचे दोन फलंदाज रोमन वॉकरने माघारी पाठवले.
पुल शॉट मारण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा २५ धावांवर बाद झाला, तर हनुमा विहारीनेही ३ धावांवर विकेट टाकली. भारताची अवस्था ३ बाद ५४ अशी झाली. प्रसिद्ध कृष्णाने भारताला चौथा धक्का देताना श्रेयस अय्यरला भोपळ्यावर माघारी पाठवले. भारताचे ४ फलंदाज ५५ धावांवर तंबूत परतले. त्यानंतर आलेल्या रवींद्र जडेजा व विराट कोहली यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी पाचव्या व विकेटसाठी २६ धावांची भागीदारी केली. वॉकरने ही जोडी तोडताना जडेजाला १३ धावांवर LBW केले. भारताचा निम्मा संघ ८१ धावांवर माघारी परतला..
Web Title: LEIvIND : 21-year-old Roman Walker gets Rohit Sharma, Hanuma Vihari, Ravindra Jadeja and India 81 for 5, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.