India Tour of England : लिसेस्टरशायर क्लबविरुद्धच्या सराव सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय संघाचे आघाडीचे फलंदाज ढेपाळले. लंच ब्रेकपर्यंत टीम इंडियाचा निम्मा संघ ९० धावांवर माघारी परतला. रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, हनुमा विहारी हे फलंदाज २१ वर्षीय गोलंदाज रोमन वॉकर ( Roman Walker) च्या गोलंदाजीवर माघारी परतले. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, यष्टिरक्षक रिषभ पंत व फलंदाज चेतेश्वर पुजारा हे लिसेस्टरशायर क्लबकडून खेळत आहेत. बुमराह विरुद्ध रोहित हा सामना पाहायला सारेच उत्सुक होते आणि बुमराहने टाकलेला भन्नाट चेंडू रोहितच्या नको त्या जागी लागला अन् तो वेदनेने कळवळला...
४ दिवसीय सराव सामन्यात दोन्ही संघांकडून १३-१३ खेळाडू खेळणार आहेत. सराव सामना एकच असल्याने भारताच्या चमूतील सर्व खेळाडूंना खेळता यावे यासाठी काही खेळाडू लिसेस्टरशायर क्लबकडून खेळत आहेत. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. लोकेश राहुलने दुखापतीमुळे माघार घेतल्याने शुबमन गिलचे इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत सलामीला खेळणे पक्के झाले आहे. १०व्या षटकात गिल व शर्मा यांची ३५ धावांची भागीदारी संपुष्टात आली. विल डेव्हिसच्या गोलंदाजीवर रिषभने यष्टिंमागे सुरेख झेल टिपला अन् गिल २१ धावांवर बाद झाला. त्यानंतर १६व्या आणि १८ व्या षटकात भारताचे दोन फलंदाज रोमन वॉकरने माघारी पाठवले.
पुल शॉट मारण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा २५ धावांवर बाद झाला, तर हनुमा विहारीनेही ३ धावांवर विकेट टाकली. भारताची अवस्था ३ बाद ५४ अशी झाली. प्रसिद्ध कृष्णाने भारताला चौथा धक्का देताना श्रेयस अय्यरला भोपळ्यावर माघारी पाठवले. भारताचे ४ फलंदाज ५५ धावांवर तंबूत परतले. त्यानंतर आलेल्या रवींद्र जडेजा व विराट कोहली यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी पाचव्या व विकेटसाठी २६ धावांची भागीदारी केली. वॉकरने ही जोडी तोडताना जडेजाला १३ धावांवर LBW केले. भारताचा निम्मा संघ ८१ धावांवर माघारी परतला. लंच ब्रेक झाला तेव्हा भारताच्या ५ बाद ९० धावा झाल्या होत्या.