India Tour of England : लिसेस्टरशायर क्लबविरुद्धच्या सराव सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय संघाचे आघाडीचे फलंदाज ढेपाळले. ५ बाद ८१ अशी अवस्था असलेल्या भारतीय संघाच्या मदतीला विराट कोहली ( Virat Kohli) व केएस भरत धावून आले आहेत. या दोघांनी लंच ब्रेकनंतर भारताची पडझड थांबवली आहे आणि संघाने ५ बाद ११८ धावांपर्यंत मजल मारली आहे. या सामन्यातील विराटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चिचा जात आहे. त्यात विराट कोहली इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट ( Joe Root ) याच्यासारखा मॅजिक करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय, परंतु त्याचा हा प्रयत्न सपशेल फसलेला पाहायला मिळतो.
काही दिवसांपूर्वी लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत इंग्लंडचा फलंदाज जो रूटने करिष्मा दाखवला होता. नॉन स्ट्राईकवर उभ्या असलेल्या जो रूटने बॅट हातात घेतली, पण त्याआधी काही वेळ बॅट कशाचाही आधार न घेता मैदानावर नीट उभी होती. हे रूटने नक्की कसे केले? याचीच सर्वत्र चर्चा रंगली होती. तसाच काहीसा प्रयत्न आज विराट कोहली करताना दिसला.
कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. १०व्या षटकात गिल व शर्मा यांची ३५ धावांची भागीदारी संपुष्टात आली. विल डेव्हिसच्या गोलंदाजीवर रिषभने यष्टिंमागे सुरेख झेल टिपला अन् गिल २१ धावांवर बाद झाला. पुल शॉट मारण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा २५ धावांवर बाद झाला, तर हनुमा विहारीनेही ३ धावांवर विकेट टाकली. प्रसिद्ध कृष्णाने भारताला चौथा धक्का देताना श्रेयस अय्यरला भोपळ्यावर माघारी पाठवले. रवींद्र जडेजा व विराट कोहली यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी पाचव्या व विकेटसाठी २६ धावांची भागीदारी केली. वॉकरने ही जोडी तोडताना जडेजाला १३ धावांवर LBW केले. भारताचा निम्मा संघ ८१ धावांवर माघारी परतला.