पुणे : पुलवामा येथील हल्ल्यानंतर आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरूद्ध खेळावे की नाही, याचा निर्णय केंद्र सरकारला घेऊ द्या. आम्ही त्यांचा निर्णय मान्य करू, असे मत भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी शुक्रवारी पुण्यात व्यक्त केले.
सिंहगड इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित विविध क्रीडा स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ कपिल देव यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ‘पुलवामा हल्ल्यानंतर विश्वचषकात भारताने पाकविरूद्ध खेळावे की नाही,’ हा प्रश्न एका विद्यार्थिनीने विचारल्यावर स्पष्टपणे मत मांडण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कपिल देव यांनी त्यावर थेट उत्तर द्यायचे टाळले. ते म्हणाले, ‘‘या प्रश्नाचे उत्तर देण्याइतका बुद्विवान माणूस मी नाही. भारताने पाकविरूद्ध खेळावे की नाही, याचा निर्णयआपण सरकारला घेऊ द्यायला हवा.’’ स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपदाचा मान सिंहगड कॉलेज आॅफ इंजीनियरिंग संघाने पटकावला. यावेळी माजी क्रिकेटपटू प्रवीण आमरे, संस्थेचे उपाध्यक्ष रोहित नवले, संस्थापक सचिव डॉ. सुनंदा नवले यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.