लंडन : ‘कोरोना महामारीच्या नियमांमुळे जर खेळाडूंना ऑस्ट्रेलियाच्या चार महिन्यांच्या दीर्घ दौऱ्यावर कुटुंबीयांना सोबत नेण्याची परवानगी मिळत नसेल, तर अॅशेस मालिका रद्द करण्यात यावी,’ असे स्पष्ट मत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने मांडले.ब्रिटिश प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅशेस मालिकेसाठी इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना आपल्या कुटुंबीयांसह दौऱ्यावर जाण्याची परवानगी मिळणार नसल्याची शक्यता आहे.
८ डिसेंबरपासून ही प्रतिष्ठेची मालिका सुरू होणार आहे. यावर वॉनने ट्विट केले की, ‘इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना अॅशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आपल्या कुटुंबीयांना सोबत नेता येणार नसल्याच्या बातम्या ऐकण्यास मिळत आहेत. जर असे असेल, तर मालिका रद्द करण्यात यावी. चार महिने कुटुंबीयांपासून दूर राहणे कधीच मान्य करता येणार नाही.’या गोष्टीचा इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन यानेही विरोध केला आहे. अशा परिस्थितीत खेळाडूंनी खेळण्यास मनाई केली तर त्यांना दोष देऊ नये, असे पीटरसन म्हणाला.
त्याने म्हटले की, ‘यंदाच्य अॅशेस मालिकेतून कोणत्या खेळाडूने माघार घेतली तर त्याला माझा पूर्ण पाठिंबा असेल. कुटुंब खेळाडूंसाठी खूप महत्त्वाचे आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये तर कुटुंबीयांची साथ सर्वाधिक महत्त्वाची आहे.’ या मालिकेला अद्याप बराच वेळ शिल्लक असून, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या मुद्द्यावर मार्ग काढण्यात येईल, असे सांगितले आहे. इंग्लंडचे क्रिकेटपटू बांगलादेश आणि पाकिस्तान दौऱ्यावर कुटुंबीयांविना जातील. यानंतर ऑक्टोबरमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धा होईल.