नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्राॅफीदरम्यान रोहित शर्माच्या निवृत्तीच्या अनावश्यक चर्चांमुळे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर खूप निराश झाले आहेत. सध्याच्या भारतीय कर्णधारासारख्या दिग्गज खेळाडूंना आपल्या भविष्याचा निर्णय घेण्यासाठी पुरेसा वेळ देणे गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. नऊ महिन्यांत भारताला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (आयसीसी) दुसरा किताब जिंकून दिल्यानंतर रोहितने स्वत:च्या भविष्याबाबतच्या सर्व अफवा फेटाळून लावताना एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार नसल्याचे सांगितले. रोहितने आतापर्यंत २०२७ सालचा एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक खेळण्याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही. पण, त्याच्या उपस्थितीत भारतीय संघ बळकट असेल, असे वेंगसरकर यांनी म्हटले. वेंगसरकर म्हणाले की, ‘मी ज्योतिषी नाही. २०२७ विश्वचषकापर्यंत खूप सामने होणार आहेत. त्याचा फाॅर्म आणि तंदुरुस्तीवर सर्व काही अवलंबून असेल. त्यामुळे आता काहीही बोलणे योग्य होणार नाही. पण तो कर्णधार आणि खेळाडू म्हणून आतापर्यंत शानदार ठरला आहे. मला ठाऊक नाही की, लोक त्याच्या निवृत्तीबाबत अंदाज का बांधत होते. हे अनावश्यक आहे. त्याच्या सारख्या खेळाडूला आपल्या भविष्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार असायला हवा.’
टी-२० विश्वचषक २०२४ आणि चॅम्पियन्स ट्राॅफी दोन्ही स्पर्धांमध्ये फलंदाजीसाठी आव्हानात्मक परिस्थिती असताना रोहितने शानदार कामगिरी केली. अंतिम लढतीत न्यूझीलंडविरुद्ध अतिशय दबावात लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने धडाकेबाज फलंदाजी केली. वेंगसरकर म्हणाले की, ‘सध्या रोहित शानदार फाॅर्मात आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने तीन द्विशतके झळकावली आहेत. त्याच्याबद्दल आणखी काय बोलता येईल.’