नवी दिल्ली : आशिया चषक स्पर्धेच्या आयोजनाबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. आयपीएल अंतिम सामन्यानंतर होणाऱ्या बैठकीत यावर निर्णय होईल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी सांगितले.
शाह यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘आशिया चषक स्पर्धा कुठे आयोजित होणार यावर अद्याप निर्णय झालेला नाही. सध्या आम्ही आयपीएलमध्ये व्यस्त आहोत. आयपीएल अंतिम सामन्यासाठी श्रीलंका क्रिकेट, बांगलादेश आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डचे वरिष्ठ अधिकारी येणार आहेत. याबाबत चर्चा करून आम्ही योग्यवेळी निर्णय घेऊ.’यंदाची आशिया चषक स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार आहे आणि केंद्र सरकारच्या परवानगीविना बीसीसीआय पाकिस्तानात जाऊ शकणार नाही. यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे (पीसीबी) नजम सेठी यांनी ‘हायब्रीड मॉडेल’ समोर ठेवले होते. एसीसी सूत्रांनुसार, पीसीबीच्या या मॉडेलनुसार श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ आणि अफगाणिस्तान यांचे साखळी सामने पाकिस्तानात होतील, तर भारतीय संघ आपले सामने त्रयस्थ ठिकाणी खेळेल. भारत-पाकिस्तान लढत श्रीलंकेत होण्याची शक्यता आहे. परंतु, पीसीबीला हा सामना दुबईत खेळविण्याची इच्छा आहे.
एसीसीच्या सूत्रांनी वृत्तसंस्थेला माहिती दिली की, ‘एसीसी अध्यक्ष जय शाह याबाबत बैठक बोलावणार असून, यामध्ये अंतिम निर्णय घेण्यात येईल. पीसीबीला भारताविरुद्ध त्रयस्थ ठिकाणी खेळविण्यात कोणतीही अडचण नाही; पण त्यांना हा सामना यूएईमध्ये खेळवायचा आहे.’ आशिया चषक स्पर्धा १ ते १७ सप्टेंबरदरम्यान होईल.