यंदाची मुंबई क्रिकेट संघटनेची (एमसीए) निवडणूक अत्यंत साधेपणाने आणि फार काही गाजावाजा न होता पार पडली. या आधी अनेक राजकीय व्यक्तींनी निवडणुकीत सहभाग घेतलेला असल्याने, एमसीएच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहायचे. मात्र, यंदा तसे काहीच झाले नाही. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या लोढा समितीच्या शिफारशींचा अवलंब केल्यानंतर अनेक राजकीय व्यक्ती या निवणुकीत प्रत्यक्ष सहभागी होण्यापासून दूर राहिले. त्यामुळेच अध्यक्षपदासाठी उभे राहिलेल्या डी. वाय. पाटील क्रीडा अकादमीचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांना यंदा सर्वच सभासदांचा जाहीर पाठिंबा मिळाला. पाटील यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान पाहता, एमसीएला भक्कम नेतृत्व मिळाल्याची भावनाही अनेकांनी व्यक्त केली. या निमित्तानेच ‘लोकमत’च्या रोहित नाईक यांनी डॉ. विजय पाटील यांच्याशी साधलेला संवाद...एमसीएच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर काय प्रतिक्रिया होती?मी खूप आनंदी आहे. सर्व सभासदांनी मला एकमताने निवडून दिले याचा आनंद असून, त्यांचा मी कृतज्ञ आहे. एमसीएमध्ये अनेक लहान-मोठे घटक आहेत आणि सर्वांनी मला पाठिंबा दिला. मी मुंबई क्रिकेटसाठी काहीतरी करू शकतो, असा विश्वास सर्वांनी माझ्यावर दाखविला. तो विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेन. अध्यक्षपदावर निवडून देण्यासाठी सर्वांना मी धन्यवाद देतो.
या आधी ज्या गटाविरुद्ध लढलात, त्या महाडदळकर गटानेही तुम्हाला पाठिंबा दिला. याविषयी काय सांगाल?विरोधी गटाकडूनही पाठिंबा मिळाल्याचे कळाले, तेव्हा आनंदच झाला. विचारामध्ये नक्कीच मतभेद असू शकतात, परंतु सर्वांची एकच मनापासून इच्छा आहे की, मुंबई क्रिकेटला यशाच्या उंचीवर नेणे. प्रत्येकाचे मार्ग वेगळे असतात. त्यामुळे सर्वसमंतीने अध्यक्षपदासाठी निवड झाली, याचा आनंद असून आता सर्वांना एकत्रितपणे घेऊनच पुढील कार्य करायचे आहे.
लोढा शिफारशींचा किती फायदा झाला?लोढा समितीने ज्या शिफारशी दिल्या, त्या अंमलात आल्या एवढेच मी म्हणेन. यामुळे खेळाडूंना एकप्रकारे न्याय मिळेल, असे मला वाटते. त्यांच्या बऱ्याचशा शिफारशी संघटनेने अंमलात आणलेल्या आहेत. काही शिफारशींबद्दल दुमत असेल, पण त्याबाबत सकारात्मक भूमिका घेत पुढे जावे लागेल, पण एक गोष्ट आहे की, या शिफारशींचा परिणाम पुढील ४-५ वर्षांमध्ये संपूर्ण देशात नक्कीच पाहण्यास मिळेल.
खेळांच्या मैदानाकडे कसे लक्ष द्याल?मैदानांवर लक्ष देणे सर्वात महत्त्वाचे काम आहे. मुंबईत आज नवीन मैदान तयार करणे खूप कठीण आहे. कारण जागेची कमतरता आहे. त्यामुळे पालघर, डहाणू, डोंबिवली, नवी मुंबई अशा परिसरामध्ये खेळाडूंसाठी जास्तीतजास्त मैदाने तयार करण्यावर संघटनेचा भर असेल, पण हे करत असताना मैदानावर पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहांची व्यवस्था अशा अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींची पूर्तता करण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि हेच आमचे उद्दिष्ट्य आहे. अनेक ठिकाणी हेरिटेज प्रकल्पाच्या मर्यादा असतात. त्या दृष्टीने आम्ही पर्याय काढू, तसेच खेळाडूंना जास्तीतजास्त सुविधा देण्यावर आमचा भर असेल.
तळागाळात खेळ कसा नेणार?आपले अनेक खेळाडू उपनगरातून शहरांत येत असतात. त्यासाठी ठिकठिकाणी मैदाने व्हायला पाहिजेत, असे माझे मत आहे. त्यामुळेच जास्तीतजास्त मैदाने उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असेल. खेळाच्या प्रसाराविषयी म्हणाल, तर शालेय आणि महाविद्यालयीन क्रिकेटवर जास्त लक्ष द्यावे लागेल. हाच भक्कम पाया असून, यासाठी आमची टीम नक्कीच काम करेल.
महिला क्रिकेटसाठी काय योजना आहेत?मला सांगण्यास अतिशय आनंद वाटतो की, या विषयावर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. नुकताच त्यांनी एमसीएच्या नव्या सदस्यांची भेट घेतली. अनेक विषय त्यांनी सुचविले, यामध्ये महिला क्रिकेटवरही मोठी चर्चा झाली. आम्हालाही महिला-पुरुष असा भेदभाव न करता एक समान प्रक्रिया राबवायची आहे. महिला क्रिकेटला प्रोत्साहन देणे आवश्यक असून, त्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल.
युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे मार्गदर्शन मिळण्यासाठी कसे प्रयत्न कराल?मुंबईने देशाला नामवंत खेळाडू दिले आहेत, हे आमचे भाग्य म्हणावे लागेल की, एवढ्या महान खेळाडूंचा संच आमच्याकडे आहे. तेव्हा नक्कीच खेळाच्या आणि संघटनेच्या प्रगतीसाठी आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे मत नक्कीच जाणून घेणार. त्याचा युवा खेळाडूंनाही फायदा मिळवून देणार. प्रशासकीय कार्य हे पदाधिकाऱ्यांनी पाहावे आणि खेळाविषयीच्या गोष्टी दिग्गज खेळाडूंनी सांभाळाव्यात, अशी आमची इच्छा आहे.
मुंबई क्रिकेटचा चेहरा बदलण्यासाठी काय योजना आहेत?मुळात आता काळानुसार आपल्याला बदलावे लागणार आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये बदल असतोच. विविध तंत्राचा वापर करावा लागेल. एखादी संस्था ना नफा तत्त्वावर चालविली जात असली, तरी त्यात व्यवसायिकता आणावी लागते. त्यामुळे संस्थेचे सोशल मार्केटिंग करणे गरजेचे आहे. केवळ सदस्य नाही, तर चाहते, प्रसारमाध्यमे अशा सर्व घटकांसाठी काम करायचे आहे. त्या दृष्टीने व्यवस्थित नियोजन करून पुढील काळात हे काम करायचे आहे.अध्यक्ष म्हणून तुमचे काय लक्ष्य आहे?मुंबई क्रिकेटची उज्ज्वल परंपरा आहे. भारतीय क्रिकेटचा जेव्हा विचार होतो, तेव्हा मुंबईचे स्थान अव्वल आहे. अनेक वर्षांपासून रणजी चषकसारख्या मानाच्या स्पर्धेत आपण अव्वल राहिलो आहोत. देशाला मुंबईने अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू दिलेत. त्यामुळे आपले क्रिकेट खालावले आहे, असे मला अजिबात वाटत नाही. केवळ आपल्याला काळानुरूप प्रगत होण्याची गरज आहे. अपग्रेड व्हावे लागेल. यासाठी खेळाचा दर्जा आणखी उंचाविण्याचा आमचा प्रयत्न असून, त्या दृष्टीने आम्ही सर्व कार्यकारणी मंडळी कामाला लागू.