अहमदाबाद : ‘अर्जुन तेंडुलकरची गोलंदाजी चांगली आहे. तो युवा असून, आयपीएलमध्ये पहिल्यांदाच खेळण्याची संधी मिळाल्यानंतर तो अनुभवातून खूप शिकेल. तो सुमारे १३० प्रतितास वेगाने मारा करत असून, त्याच्या गोलंदाजीचा वेग वाढवण्यावर आम्ही काम करू,’ असे मुंबई इंडियन्सचे गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँड यांनी सांगितले.
पंजाब किंग्जविरुद्ध अर्जुनने एकूण ४८ धावांची खैरात केली होती. यामध्ये एका षटकात त्याने ३१ धावा दिल्या होत्या. परंतु, गुजरातविरुद्ध त्याने दमदार पुनरागमन करताना २ षटकांत ९ धावा देत एक बळीही घेतला. बाँड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, ‘पंजाबविरुद्धच्या सामन्यात जे काही झाले, त्यानंतर अर्जुनने चांगली गोलंदाजी केली. इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या प्रेक्षकांसमोर खेळणे सोपे नसते. आम्ही त्याचा वेग वाढवण्यावर काम करू. परंतु, गुजरातविरुद्ध आम्ही त्याला ज्या प्रकारे गोलंदाजी करण्यास सांगितले होते, त्याने त्याप्रकारेच मारा केला.’