Join us  

Liam Livingstone Shivam Dube, IPL 2022 CSK vs PBKS: 'किंग्ज'च्या लढाईत पंजाबचं 'बल्ले बल्ले'! चेन्नईची पराभवाची लाजिरवाणी हॅटट्रिक

पंजाबचा चेन्नईवर ५४ धावांनी मोठा विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2022 11:22 PM

Open in App

Punjab Kings beat Chennai Super Kings, IPL 2022 CSK vs PBKS Live: पंजाब विरूद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा ५४ धावांनी मोठा पराभव झाला. पंजाब किंग्जने दमदार फलंदाजी करत २० षटकात १८० धावा केल्या. लियम लिव्हिंगस्टोनचे अर्धशतक (६०) आणि शिखर धवन (३३), जितेश शर्मा (२६) यांच्या छोटेखानी पण दणकेबाज खेळी यांच्या जोरावर पंजाबने चेन्नई सुपर किंग्जला १८१ धावांचे मोठे आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा डाव १२६ धावांवर आटोपला. त्यामुळे चेन्नईची पराभवाची हॅटट्रिक झाली. पंजाबकडून ६० धावा, दोन बळी आणि एक झेल टिपणाऱ्या लियम लिव्हिंगस्टोनला सामनावीर घोषित करण्यात आले.

१८१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या संघाची सुरूवात खूपच खराब झाली. कगिसो रबाडाने ऋतुराज गायकवाडला (१) स्वस्तात बाद केले. त्यानंतर वैभव अरोराने चांगल्या लयीत असलेल्या रॉबिन उथप्पाला (९) आणि मोईन अलीला (०) तंबूत धाडले. पाठोपाठ अर्शदीप सिंग आणि ओडियन स्मिथ दोघांनी रविंद्र जाडेजा (०) आणि अंबाती रायुडूला माघारी धाडलं. त्यामुळे चेन्नईची अवस्था ७ षटकात ५ बाद ३६ धावा अशी झाली होती. शिवम दुबेने दमदार अर्धशतक झळकावत CSKच्या आशा पल्लवित केल्या पण तो ५७ धावा काढून बाद झाला. त्यानंतर लियम लिव्हिंगस्टोनने त्याला आणि पुढच्याच चेंडूवर ड्वेन ब्राव्होलाही (०) बाद केलं. शेवटची आशा असलेला धोनीदेखील २८ चेंडूत २३ धावा काढून बाद झाला. अखेर चेन्नईला यंदाच्या हंगामात पराभवाच्या हॅटट्रिकला सामोरं जावं लागलं.

तत्पूर्वी, पंजाबच्या डावाची सुरुवात खराब झाली. मयंक अग्रवाल (१) आणि भानुका राजपक्षे (९) स्वस्तात बाद झाले. त्यानंतर शिखर धवन आणि लियम लिव्हिंगस्टोन या दोघांनी ९५ धावांची भागीदारी केली. लिव्हिंगस्टोन ६० धावांवर बाद झाला. तर शिखर धवनने ३३ धावा केल्या. या दोघांनंतर नवोदित खेळाडू जितेश शर्मा याने ३ षटकार खेचून २६ धावांची उपयुक्त खेळी केली. पण तो बाद झाल्यावर पंजाबची धावगती संथ झाली. त्यामुळे एकेवेळी २००पार मजल मारू शकणाऱ्या पंजाबला २० षटकात १८० पर्यंतच मजल मारता आली.

टॅग्स :आयपीएल २०२२पंजाब किंग्सचेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनी
Open in App