लखनौ : लिझेल ली हिने कारकिर्दीत सर्वोच्च खेळी करीत नाबाद शतक ठोकले. या खेळीच्या जोरावर द. आफ्रिकेने पावसाच्या व्यत्ययात झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाचा शुक्रवारी डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे सहा धावांनी पराभव केला. यासह आफ्रिकेने पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. लिझेलने १३१ चेंडूंवर १६ चौकार व दोन षटकारांसह नाबाद १३२ धावा ठोकल्या. या जोरावर २४९ धावांचा पाठलाग करणाऱ्या द. आफ्रिकेने ४६.३ षटकात ४ बाद २२३ धावांपर्यंत मजल मारली तोच पावसाने हजेरी लावली. यामुळे खेळ थांबला. त्यावेळी द. आफ्रिका संघ डकवर्थ-लुईस नियमानुसार सहा धावांनी पुढे होता.
त्याआधी, पुनम राऊतचे अर्धशतक (७७ धावा,१०८ चेंडू, ११ चौकार) तसेच मिताली राज (५० चेंडूत ३६ धावा), हरमनप्रीत कौर (४६ चेंडूत ३६) व अष्टपैलू दिप्ती शर्माच्या (४९ चेंडूत नाबाद ३६ धावा) खेळीमुळे भारताने ५ बाद २४८ अशाी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. विजयी पाठलाग करणाऱ्या द. आफ्रिकेकडून लिझेलने कर्णधार लॉरा वोलवार्टसोबत (१२) ४१ धावांची सलामी दिली. दीप्तीने नवव्या षटकात ही जोडी फोडली. अनुभवी झुलन गोस्वामीने लारा गुडॉलला बाद केले. लिझेलने मात्र मिगनॉन प्रीजसोबत (४६ चेंडूत ३७) ९७ धावांची भागीदारी केली. लिझेलने एक टोक सांभाळून हरमनला षटकार खेचून तिसरे शतक पूर्ण केले. या प्रकारातील ही तिची सर्वोच्च खेळी आहे.
संक्षिप्त धावफलक
भारत : ५० षटकात ५ बाद २४८ धावा (स्मृती मानधना २५, पूनम राऊत ७७, हरमनप्रीत कौर ३६, मिताली राज ३६, दिप्ती शर्मा नाबाद ३६, सुषमा वर्मा नाबाद १४, शबनीम इस्माईल २/४६, केंप १/४७, सेखुखुने १/५३, ॲनी बॉश १/२९.) पराभूत (डकवर्थ लुईस नियम) वि. द. आफ्रिका : ४६.३ षटकात ४ बाद २२३ धावा (लीझेल ली नाबाद १३२, मिगनोन प्रिझ ३७, गुडॉल १६, लॉरा १२, ॲनी बॉश नाबाद १६, झुलन गोस्वामी २/२०, राजेश्वरी १/३९, दिप्ती शर्मा १/३९.)
लिझेलची आक्रमकता
द. आफ्रिकेला अखेरच्या पाच षटकांत ३८ धावांची गरज होती. त्याचवेळी लिझेलने हरमनप्रितला सलग दोन चौकार मारले. तिने ॲनी बोशसोबतही ४५ धावांची नाबाद भागीदारी केली.
Web Title: Liezel Lee's century d. Africa victorious
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.