वेगवान गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केल्यानंतर डेव्हिड वॉर्नर वगळता इतर फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे अखेरपर्यंत रंजक ठरलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलमध्ये गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्सला ४ गडी राखून पराभूत केले. सलग पाच पराभवानंतर यंदाच्या मोसमातील दिल्लीचा हा पहिलाच विजय ठरला.
पावसामुळे एक तास उशिरा सुरू झालेल्या या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाताचा डाव २० षटकांत १२७ धावांवर संपुष्टात आला. दिल्लीने १९.२ षटकांत ६ बाद १२८ धावा करताना विजय साकारला. केकेआरविरुद्धच्या विजयानंतर डगआउटमध्ये बसलेले दिल्लीचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि डीसीचे क्रिकेट संचालक सौरव गांगुली यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. या विजयाने दादा किती उत्साही आहेत, याचा अंदाज या सामन्यानंतर समोर आलेल्या विधानावरून लावता येईल.
सौरव गांगुली म्हणाला की, दिल्ली कॅपिटल्सने पहिला विजय नोंदवला याचा आनंद आहे. त्या पहिल्या विजयाचे दडपण इतके मोठे होते की, मी २५ वर्षांपूर्वी माझी पहिली कसोटी धावा केल्यासारखे वाटत होते. आज आम्ही थोडे भाग्यवान होतो. आजही आम्ही चांगली गोलंदाजी केली आहे पण फलंदाजी ही आमच्यासाठी मोठी समस्या बनली होती. मला माहित आहे की आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. त्यात सुधारणा कशी करता येईल हे पाहावे लागेल. आम्ही या मुलांसोबत खूप मेहनत घेतली आणि त्यांना फॉर्ममध्ये आणण्याचा प्रयत्न केला. मग तो पृथ्वी शॉ असो वा मिचेल मार्श. हे सर्वजण संघासाठी अत्यंत महत्त्वाचे खेळाडू आहेत, असं सौरव गांगुलीने सांगितले.
विजयासाठी १२८ धावांचा पाठलाग करताना दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांनी ३८ धावांची सलामी दिली. पृथ्वी शॉ (१३) वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला. त्यानंतर मिशेल मार्श (२), फिल साल्ट (५) हे झटपट बाद झाल्याने दिल्लीची अवस्था तीन बाद ६७ अशी झाली होती. मात्र, वॉर्नरने अर्धशतक झळकावत संघाला विजयाजवळ नेले. चौदाव्या षटकात बाद झालेल्या वॉर्नरने ४१ चेंडूंत ११ चौकारांसह ५७ धावा केल्या. त्यानंतर मनिष पांडे (२१), हकीम खान (०) बाद झाल्यावर अक्षर पटेल (नाबाद १९) व ललित यादव (नाबाद ४) यांनी दिल्लीचा विजय साकारला.
तत्पूर्वी, दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय योग्य ठरला. पॉवर प्लेमधील सहा षटकांत केकेआरने ३५ धावांत तीन फलंदाज गमावले. कर्णधार नितीश राणा (४), व्यंकटेश अय्यर (०), लिटन दास (४), रिंकु सिंग (६), मनदीप सिंग (१२) झटपट बाद झाले. त्यानंतर आंद्रे रसेल याने झुंज देताना चार षटकार व एका चौकारासह नाबाद ३८ धावा केल्या. त्याने संघाला १२७ पर्यंत मजल मारून दिली. दिल्लीकडून ईशांत शर्मा, अनरिच नॉर्टजे, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.