मीरारोड - भाईंदर पश्चिमेस गणेश देवल नगर झोपडपट्टी येथील किराणा दुकानातून बेकायदा विक्री केला जात असलेला विदेशी व देशी दारूसाठा जप्त करण्यात आला. तसेच, याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाईंदर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक रघुनाथ नरोटे यांना माहिती मिळाली की , छोटू उर्फ चोधाराम चौधरी ( २६ ) नावाचा व्यक्ती किराणा दुकानातून बेकायदा दारू विक्री करत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत नाईकवाडी यांनी तात्काळ कारवाईचे निर्देश दिल्या नंतर नरोटे हे शिपाई प्रकाश कांबळे सह गणेश देवल नगर मधील हनुमान मंदिर जवळ असलेल्या छोटू चौधरी याच्या किराणा दुकानावर छापा टाकला असता तेथे चौधरी हा दोघा गिऱ्हाईकांना दारू विक्री करत असताना सापडला .
पोलिसांनी दुकानात तपासणी केली असता देशी आणि विदेशी दारूच्या बाटल्या, बिअर हे विक्रीसाठी ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी दारूसाठा जप्त करत चौधरी सह त्याचा साथीदार मोहम्मद सत्तार हनीफ ( २४ ) रा . शिमला गल्ली ३ ह्या दोघांना ताब्यात घेतले. भाईंदर पोलिसांनी त्यांच्यावर ५ एप्रिलच्या मध्यरात्री गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हे नजीकच्या दादर वाईन शॉप मधून दारू खरेदी करायचे आणि झोपडपट्टीत किराणा दुकानातून त्याचे जास्त दराने बेकायदा विक्री करत असल्याचे चौकशीत समोर आले आहे.