WTC Final 2023 IND vs AUS । लंडन : आजपासून इंग्लंडच्या ओव्हल स्टेडियमवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला सुरूवात झाली आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फंलदाजीसाठी आमंत्रित केले. मागील काही दिवसांपासून भारताच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल खूप चर्चा रंगली होती. 'अजिंक्य' राहण्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्येच 'कसोटी' लागणार हे स्पष्ट होते अन् असंच काहीसे झाल्याचे दिसते. इंग्लिश खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळते आणि त्यामुळेच कर्णधार रोहित शर्माने चार वेगवान गोलंदाजांना संधी दिली. लक्षणीय बाब म्हणजे भारताच्या संघात एकमेव फिरकीपटू म्हणून रवींद्र जडेजाला संधी मिळाली.
दरम्यान, आर अश्विनला बाकावर बसवल्याने चाहते प्रश्न विचारत आहेत. पण यामागचे कारण काय? हा देखील एक प्रश्नच आहे. भारतीय गोलंदाज मोठ्या कालावधीनंतर कसोटी क्रिकेट खेळत आहेत, त्यामुळेच एक अतिरिक्त गोलंदाज खेळवला असावा अशी अपेक्षा करूया. कारण ट्वेंटी-२० च्या जाळ्यातून जवळपास ६ महिन्यांनी भारतीय गोलंदाज बाहेर पडले आहेत. म्हणूनच गोलंदाजांना पुरेसा वेळ मिळावा, यामुळे त्यांच्या गतीत सातत्य राहिल... कदाचित हा विचार करून कर्णधार रोहितने शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव यांचा संघात समावेश केला.
प्लेइंग XI मध्येच 'कसोटी'
भारतीय संघ ६ फलंदाज, ४ गोलंदाज आणि एका अष्टपैलू फिरकीपटूसह रिंगणात आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनकडे पाहिले तर, कांगारूच्या संघाने बाजी मारल्याचे दिसते. ऑस्ट्रेलियाच्या संघात ५ फलंदाज, २ अष्टपैलू, १ फिरकीपटू आणि ३ वेगवान गोलंदाज आहेत. ट्रॅव्हिस हेड आणि कॅमेरून ग्रीन हे अष्टपैलू खेळाडूंच्या भूमिकेत आहेत. ग्रीन वेगवान गोलंदाजी करू शकतो तर हेडमध्ये फिरकी गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. ट्वेंटी-२० मध्ये देखील फिरकी गोलंदाजी करणाऱ्या ट्रॅव्हिस हेडला इथेही गोलंदाजी करायला मिळेल यात शंका नाही. एकूणच भारत १ आणि ऑस्ट्रेलिया २ फिरकीपटूंसह मैदानात आहे. लक्षणीय बाब म्हणजे शार्दुल ठाकूरमध्ये फलंदाजी करण्याची देखील क्षमता असल्याने त्याला संघात स्थान दिले असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलियाचा संघ -
पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबूशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरून ग्रीन, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, स्कॉट बोलंड.
Web Title: Live test match ind vs Aus India captain Rohit Sharma won the toss and decided to bowl first R Ashwin has no chance in team India's playing xi while Australia has fielded 2 spinners
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.