न्यूझीलंडचा अनुभवी क्रिकेटपटू सायमन डॉल ( Simon Doull) आता समालोचन करत आहे. तो सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. अलीकडेच त्याने लाईव्ह कॉमेंट्री दरम्यान पाकिस्तानी कर्णधार बाबर आजमच्या स्ट्राईक रेटवर टीका केली होती. यानंतर त्याचा माजी पाकिस्तानी क्रिकेटर आमिर सोहेलसोबत वाद झाला. पुन्हा एकदा सायमन चर्चेत आला आहे. यावेळी पुन्हा त्याने पाकिस्तानवरच टीका केली आहे. तो म्हणाला की, पाकिस्तानमध्ये राहणे म्हणजे तुरुंगात राहण्यासारखे आहे.
त्याने देवाचे आभार मानले आणि सांगितले की कसे तरी त्याने पाकिस्तान सोडले. किवी दिग्गजाने सांगितले की, त्याला पाकिस्तानमध्ये खूप मानसिक छळ सहन करावा लागला. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू सायमनने पाकिस्तानी चॅनल जिओ न्यूजला सांगितले की, 'पाकिस्तानमध्ये राहणे म्हणजे तुरुंगात राहण्यासारखे आहे. मला बाहेर जाऊ दिले नाही, कारण बाबर आजमचे चाहते माझी वाट पाहत होते. बरेच दिवस काहीही न खाता मला पाकिस्तानात राहावे लागले. मी मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ होतो. पण देवाचे आभार मानतो की मी कसा तरी पाकिस्तानातून बाहेर पडू शकलो.'
न्यूझीलंड क्रिकेट संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. येथे दोन्ही संघांमध्ये पाच ट्वेंटी-२० सामन्यांची महत्त्वाची मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी लाहोरमध्ये होणार आहे. या मालिकेतील पहिले तीन ट्वेंटी-२० सामने लाहोरमध्ये आणि उर्वरित दोन सामने रावळपिंडीत खेळवले जातील. ट्वेंटी-२० नंतर न्यूझीलंडला पाकिस्तानच्या भूमीवर पाच वन डे सामन्यांची मालिकाही खेळायची आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने रावळपिंडीत आणि उर्वरित तीन सामने कराचीत होतील. मालिकेतील पहिला वन डे सामना २७ एप्रिल रोजी होणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"