मुंबई :
जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या लियाम लिव्हिंगस्टोनच्या सलग दुसऱ्या अर्धशतकी तडाख्याच्या जोरावर पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सविरुद्ध ९ बाद १८९ धावा उभारल्या. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर पंजाबची सुरुवात अडखळती झाली. मात्र, लिव्हिंगस्टोनने पुन्हा एकदा आपल्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर पंजाबला सावरले.
दवाचा होणारा परिणाम पाहून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर गुजरातने अचूक मारा केला. त्यांनी पाचव्याच षटकामध्ये पंजाबची २ बाद ३४ अशी अवस्था केली. येथून गुजरात पकड मिळवणार असे दिसत असताना शिखर धवन-लिव्हिंगस्टोन ही जोडी जमली. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी ५२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. नवव्या षटकात राशिद खानच्या गोलंदाजीवर कर्णधार हार्दिक पांड्याने लिव्हिंगस्टोनचा अप्रतिम झेल घेतला, मात्र यावेळी त्याच्या पायाचा सीमारेषेला स्पर्श झाल्याने लिव्हिंगस्टोनला जीवदान मिळाले. हा सुटलेला झेल गुजरातला चांगलाच महागात पडला. या जीवदानाचा फायदा घेत लिव्हिंगस्टोनने केवळ २१ चेंडूंत अर्धशतक झळकावले. यंदाच्या सत्रातील हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले.
लिव्हिंगस्टोनला जीवदान मिळाले, तेव्हा तो केवळ २० धावांवर खेळत होता. धवन बाद झाल्यानंतर जितेश शर्माने तुफानी हल्ला करताना केवळ ११ चेंडूंत २३ धावांचा तडाखा देत पंजाबच्या धावगतीला वेग दिला. त्याने राहुल तेवटियाला एकाच षटकात दोन षटकार खेचले. जितेश आणि लिव्हिंगस्टोन बाद झाल्यानंतर गुजरातने नियंत्रित मारा करत पंजाबला आक्रमकतेपासून रोखले. यामुळे चांगल्या स्थितीत असतानाही पंजाबला दोनशे पलीकडे मजल मारता आली नाही. राशिद खानने ३, तर दर्शन नळकांडेने २ बळी घेत चांगला मारा केला.
'भारी खेळून राहिले पोट्टे!'या सामन्यात विदर्भाच्या दोन खेळाडूंनी छाप पाडली. जितेश शर्माने पंजाबकडून, तर दर्शन नळकांडे याने गुजरातकडून शानदार कामगिरी केली. जितेशने गुजरातचा अष्टपैलू राहुल तेवटियाला १३व्या षटकात सलग दोन षटकार खेचले. यामुळे पंजाबच्या धावगतीला चांगला वेग मिळाला. पुढच्याच षटकात नळकांडेने आपला राज्य संघाचा सहकारी असलेल्या जितेशला झेलबाद केले.
- नळकांडेने धोकादायक ओडियन स्मिथलाही बाद केले. सलग दोन चेंडूंवर बळी घेत त्याने गुजरातला पुनरागमन करुन दिले.- शिखर धवन टी-२० क्रिकेटमध्ये एक हजार चौकार पूर्ण करणारा पाचवा, तर पहिलाच भारतीय क्रिकेटपटू ठरला.- यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत पॉवर प्लेमध्ये गुजरात आणि मुंबईने सर्वाधिक ७ बळी घेतले.- यंदाच्या आयपीएलमध्ये लियाम लिव्हिंगस्टोनने दुसऱ्या क्रमांकाचे वेगवान अर्धशतक झळकावले. सर्वात वेगवान अर्धशतक पॅट कमिन्सच्या (१४ चेंडूंत) नावावर.