आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) मंगळवारी जाहीर केलेल्या महिन्यातील सर्वोत्तम पुरस्कारात आतापर्यंत भारतीय खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळाले. २०२१पासून आयसीसीनं हा पुरस्कार सुरू केला आणि जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात अनुक्रमे रिषभ पंत ( Rishabh Pant) व आर अश्विन ( R Ashwin) यांनी बाजी मारली. मार्च महिन्याचा पुरस्कारही भारताचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार ( Bhuvneshwar Kumar) यानं पटकावला. इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत भुवीनं दमदार कामगिरी केली होती. भूवीला हा पुरस्कार मिळाल्यानं टीम इंडियानं हॅटट्रिक साजरी केली आहे.
भुवनेश्वर कुमार म्हणाला,''दुखापतीमुळे मैदानाबाहेर होतो, त्यावेळी कसून सराव केला. त्यामुळे पुन्हा कमबॅक केल्याचा आनंद होत आहे. या प्रवासात ज्यांनी ज्यांनी मला मदत केली, त्या सर्वांचे आभार. आयसीसीच्या व्होटींग अकादमीचेही आभार आणि सर्व चाहत्यांचे आभार.'' दक्षिण आफ्रिकेच्या लिझेल ली हिनं महिला क्रिकेटपटूंमध्ये मार्च महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला.