Join us  

LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला

इरफान पठाणच्या संघाची विजयी सलामी.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 3:21 PM

Open in App

LLC 2024 News : लीजेंड्स लीग क्रिकेट २०२४ च्या सलामीच्या सामन्यात कोणार्क सूर्या ओडिशा आणि मणिपाल टायगर्स हे संघ भिडले. कमी धावसंख्या असलेला हा सामना इरफान पठाणच्या अखेरच्या षटकामुळे चर्चेत आला. इरफानने अप्रतिम गोलंदाजी करुन दोन धावांनी विजय मिळवला. अखेरच्या षटकात १२ धावांचा बचाव करण्यात त्याला यश आले. कोणार्क सूर्या ओडिशाने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १०४ धावा केल्या होत्या. जोधपूर येथून या स्पर्धेला सुरुवात झाली, इथे सुरुवातीचे सहा सामने खेळवले जातील.

१०५ धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना हरभजन सिंगच्या नेतृत्वातील मणिपाल टायगर्सच्या संघाला अपयश आले. त्यांचा संघ निर्धारित २० षटकांत ८ बाद अवघ्या १०२ धावा करू शकला. या सामन्यात भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफानने १९व्या षटकापर्यंत गोलंदाजी केली नाही. त्याने २० वे षटक टाकले आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

इरफानच्या संघाची विजयी सलामी विसाव्या षटकात मणिपालच्या संघाला १२ धावांची आवश्यकता होती. इरफानने शेवटच्या षटकाची सुरुवात वाईडने केली. त्यानंतर अनुरीत सिंगने षटकार ठोकला आणि यानंतर कोणार्क संघ काहीसा दडपणाखाली दिसला. मात्र, त्यानंतर इरफानने संयम दाखवत दुसऱ्या चेंडूवर केवळ एक धाव दिली. मग तिसरा चेंडू निर्धाव गेला. त्यानंतर मणिपालला चौथ्या चेंडूवर एक तर पाचव्या चेंडूवरही एकच धाव मिळाली. शेवटच्या चेंडूवर त्यांना विजयासाठी तीन धावांची गरज होती आणि इरफानने एक बळी घेतला. या षटकात इरफानने १० धावा देऊन आपल्या संघाला दोन धावांनी विजय मिळवून दिला.

स्पर्धेसाठी दोन्ही संघ - मणिपाल टायगर्स - हरभजन सिंग (कर्णधार), रॉबिन उथप्पा, थिसारा परेरा, शेल्डन कॉटरेल, डॅन ख्रिश्चियन, अँजेलो परेरा, मनोज तिवारी, असेला गुणरत्ने, सोलोमन मिरे, अनुरीत सिंग, अबू नेचिम, अमित वर्मा, इमरान खान, राहुल शुक्ला, अमितोज सिंग, प्रवीण गुप्ता, सौरभ तिवारी. कोणार्क सूर्या ओडिशा - इरफान पठाण (कर्णधार), युसूफ पठाण, केविन ओ ब्रायन, रॉस टेलर, विनय कुमार, रिचर्ड लेवी, दिलशान मुनावीरा, शाहबाज नदीम, फिदेल एडवर्ड्स, बेन लॉफलिन, राजेश बिश्नोई, प्रवीण तांबे, दिवेश पठानिया, केपी अपन्ना, अंबाती रायुडू, नवीन स्टीवर्ट. 

टॅग्स :इरफान पठाणहरभजन सिंग