मुंबई: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी काहीही चांगले घडताना दिसत नाही. दिनेश कार्तिकच्या नेतृत्वात खेळत असलेल्या संघाला आंद्रे रसेलच्या व्यतिरिक्त इतर खेळाडूंना चमक दाखवता आली नव्हती. आयपीएल 2019च्या स्पर्धेत देखील कोलकाताच्या टीमला प्लेअॅाफ पर्यत देखील मजल मारता आली नाही. त्यातच कोलकाता नाईट रायडर्स संघाचे मुख्य प्रशिक्षक जॅक कॅलिस आणि सहाय्यक प्रशिक्षक साइमन कॅटिच यांनी जूलै महिन्यातच पदाचा राजीनामा दिला होता.
तसेच आता कोलकाता संघाची आणखी दोन खेळाडू साथ सोडणार असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू कार्लोस ब्रेथवेट आणि न्यूझीलंड संघाचा वेगवान गोलंदाज लोकी फर्ग्युसन यांचा समावेश आहे. फर्ग्युसनला आयपीएलमध्ये जास्त संधी देण्यात आली नव्हती. तसेच 2019च्या विश्वचषकात फर्ग्युसनने न्यूझीलंड संघासाठी चांगली गोलंदाजी करत संघाला अंतिम सामन्यापर्यत पोहचविले होते.
आयपीएलमध्ये फर्ग्युसनसाठी केकेआरने 1.6 कोटी रुपये मोजले होते. आयपीएलच्या मागील सत्रात त्याने फक्त 5 सामने खेळत दोन विकेट्स घेतल्या होत्या. तसेच त्याचा गोलंदाजीचा इकोनॅामी रेट 10.76 इतका राहिला होता.
त्याचप्रमाणे वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू कार्लोस ब्रेथवेटला केकेआरने 5 कोटी रुपये मोजले होते. मागील सत्रात तो फक्त दोन सामने खेळला. यामध्ये त्याने एकही विकेट्स न घेता 11 धावा केल्या होत्या.